अहमदनगर दि.१२ जुलै
पोलीस स्टेशन मधील गुन्हे शोध पथक ( डी बी) बेकायदेशीर पथकाच्या नावाखाली कर्तव्यावर असतांना नेहेमी खासगी गणवेशात म्हणजेच जीन्स, टी शर्ट, तसेच सरकारी गणवेश सोडून इतर फॉर्मल कपड्यात वावरतांना दिसतात. सदर डी.बी. नामक पथकाच्या कायदेशीर वैधतेबाबत यापूर्वीदेखील तक्रारी केल्या असता पोलीस स्टेशन प्रभारी अश्याप्रकारे डीबी पथक कार्यरत नसल्याचे खोटे अहवाल सादर करीत आलेले आहेत. दुसरीकडे याच डी. बी. पथकाचा आधार घेत सर्वच पोलीस स्टेशनला सुमारे १२ ते १५ पोलीस कर्मचारी हे सातत्याने खासगी गणवेशात कर्तव्यावर वावरत असतात. अश्याप्रकारे खासगी गणवेशात वावरण्याची परवानगी फक्त गोपनीय शाखेत काम करणारे कर्मचारी “यांनाच असतांना बेकायदेशीर डी.बी. पथकाच्या नावाखाली हे कर्मचारी सरकारी गणवेश परिधान करणेबाबतचा मा. पोलीस अधीक्षक यांचे दि. २३/०२/२०२२ च्याआदेशाचा अवमान करणाऱ्या सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी मावळ प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
या सर्वांवर शिस्तभंगाचा कळस म्हणजे मा. पोलीस अधीक्षक यांनी सरकारी गणवेश परिधान
करणेबाबत चे आदेश काढून आज रोजी सुमारे ५ महिने होत आलेले असतांना देखील सर्वच पोलीस स्टेशनला
जेव्हा एखाद्या गुन्ह्यात मुद्देमाल जप्त केला जातो अथवा आरोपी ताब्यात घेतले जातात तेव्हा प्रसारमाध्यमांना
फोटो देतांना याच सर्व बेकायदेशीर डी. बी. पथकातील कर्मचारी खासगी गणवेशात फोटो देतात व यावेळी त्यांचे वरिष्ठ अधिकारी देखील त्यांच्यासोबत असतात. त्यामुळे एकप्रकारे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाची पायमल्लीच हे अधिकारी व कर्मचारी करीत असल्याचा आरोप मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश म्हसे पाटील यांनी केला आहे.
पोलीस अधीक्षकांनी 23 फेब्रुवारी 2022 रोजी एक आदेश काढून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यामधील प्रभारी अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना गोपनीय शाखेस कामकाज करणारे पोलीस अधिकारी , अंमलदार वगळून इतर अधिकारी कर्मचारी नियमित कर्तव्य दरम्यान शासकिय गणवेश परिधान करतील. तसेच कर्तव्य बजावत असतांना गणवेशावर कोणत्याही प्रकारचे खाजगी शर्ट / अप्पर परिधान करणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी. टपाल कामी नेमण्यात आलेले पोलीस अंमलदार गणवेशातच हजर राहतील. जर आदेशाचे अवमान झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा लेखी आदेश काढला होता. मात्र त्याला केराची टोपली दाखवल्याचं अनेक ठिकाणी दिसून आले आहे त्यामुळे अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी निलेश म्हसे यांनी केली आहे.