अहमदनगर- दि.८ जानेवारी
” येणाऱ्या पंचवीस वर्षात माझा भारत देश असा असेल?” या विषयावर सर्च इंजिन गुगलच्या वतीने डूडल बनवा स्पर्धेत श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला,सावेडीच्या माध्यमिक विभागाच्या सुमारे 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य पराक्रम,गुगल शब्दाची साखळी करून अवकाशात उडणारे यंत्रमानव,25 व्या शतकातील विज्ञान,गुगल अक्षरातील हस्तमुद्रा, तांदूळ,मूग,जवस साखर ,मीठ,विविध डाळींपासून बनवलेले गुगल डूडल,योगमुद्रेतील गुगल,आधुनिक ऊर्जा साधने अशा विविध शैक्षणिक -सामाजिक-सांस्कृतिक -वैज्ञानिक -ऐतिहासिक -भौगोलिक भारताच्या संकल्पनांचा व स्वतःच्या कल्पनाशीलतेचा कौशल्याने वापर करत आणि विविध कडधान्ये,बटणे,टोक केल्यानंतरच्या पेन्सिलची वलये ,बिसलरीच्या बॉटलची बुचणे,विविध धान्याचे दाणे,झाडांची पाने, फुलांच्या पाकळ्या, रंगीत लोकर ,काचेच्या बांगड्या आदी नानाविध माध्यमांचा वापर करून शेकडो विद्यार्थ्यांनी गुगल हे नाव इंग्रजीतून रेखाटण्याचा प्रयत्न केला.यासाठी दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक व जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार तसेच गुगल एज्युकेटर डॉ.अमोल बागुल यांनी या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व परिश्रम घेतले.
“गुगलच्या डूडल बनवा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व कल्पनाशक्तीला वाव मिळण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेले सर्व डुडल्स हे त्यांच्या विविधांगी कल्पनाशक्तीचे उत्तम प्रतीक आहे.यांसारख्या कल्पनेला पंख देणाऱ्या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा मानसिक व दृष्टिकोनात्मक विकास होत असतो ” असे प्रतिपादन ॲड किशोर देशपांडे(शालेय समिती चेअरमन,श्री समर्थ विद्यामंदिर प्रशाला ,सावेडी,माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग)यांनी केले.
गुगल डूडल म्हणजे गुगल हे नाव कॅलिग्राफीच्या माध्यमातून अथवा अक्षरांना विविध संकल्पनांची जोड देऊन केलेले अक्षरलेखन होय.गुगल डूडल हे आकर्षक-मजेदार व सर्जनशील ,कल्पकता व नाविन्यता असणारे अक्षरलेखन असते.गुगल डूडल हे गुगलद्वारे गुगल सर्च इंजिन मध्ये ठेवले जाते.वर्षभरातील एखाद्या दिनविशेष दिवशी प्रसिद्ध कलाकार-व्यक्ती-शास्त्रज्ञ-महत् वाच्या जागतिक घटना व घडामोडी यांच्या दिवशी हे डूडल आपल्याला सर्च इंजिन मध्ये ” गुगल लोगो ” म्हणून पहावयास मिळते.इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही लाखो रुपयांची पारितोषिके असलेली स्पर्धा मोफत होती. गुगलचे हार्डवेअर ,फन गुगल स्वॅग ही पारितोषिके देखील प्रदान केली जाणार आहेत.
गुणवंत विद्यार्थ्यांचे श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी,मुख्याध्यापिका तथा प्राचार्या संगीता जोशी,पर्यवेक्षिका संगीता सोनटक्के,तसेच शिक्षक,पालक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.