नगर दिनांक 2 सप्टेंबर
मराठ्यांसाठी सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा असा आजचा दिवस मुंबईमध्ये उदयास आला होता. 27 ऑगस्ट रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी करता मनोज जरांगे पाटील हे अंतर्वली सराटी येथून मुंबईकडे निघाले होते. 28 ऑगस्ट रोजी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवनेरीची माती कपाळाला लावून मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आपण मुंबई सोडणार नाही असा निश्चय केला होता. 29 तारखेपासून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले. सरकारकडे त्यांनी आठ मागण्या केल्या होत्या
हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय घेण्यात याव्यात
आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी
आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी सामावून घ्यावे
मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेण्यात याव्यात
प्रलंबित जात पडताळणीला मान्यता देण्यात यावी
सातारा गॅझेट अंमलबजावणी करावी –
मराठा-कुणबी एकच शासन निर्णय देण्यात यावा
या वरील मागणी करता मनोज जरांगे पाटील लाखो मराठा बांधवांचा मुंबई येथे आमरण उपोषणास बसले होते. दोनच दिवसात संपूर्ण मुंबई जाम झाली होती. सरकारला मराठा आंदोलकांवर कारवाई करता येत नव्हती. सरकार चांगलेच कात्रीत सापडले होते. सरकारलाही अपेक्षित नव्हती एवढी गर्दी मुंबईमध्ये झाल्यानंतर सरकार दरबारी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आणि याच दरम्यान राज्य सरकारने मराठा समाजाच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची नव्याने स्थापन केली. विशेष म्हणजे, या समितीचे अध्यक्षपद मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले होते.तर समिती मध्ये
राधाकृष्ण विखे पाटील (अध्यक्ष),चंद्रकांत पाटील
गिरीश महाजन,दादा भुसे,उदय सामंत, शंभुराज देसाई,आशिष शेलार,शिवेंद्रसिंहराजे भोसले ,माणिकराव कोकाटे,बाळासाहेब पाटील
मकरंद पाटील यांचा समावेश होता.
मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसल्यापासून उपसमितीची बैठक अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाच ते सहा वेळेस घेण्यात आली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व अधिकार या उपसमितीला दिले होते. उपसमतीने निवृत्ती न्यायमूर्ती यांच्या सल्लामसलतीने कायद्यात बसेल असे आरक्षण देण्याबाबत तीन ते चार दिवस चर्चा केली. यादरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिलेल्या काही मुलाखतीमुळे मराठा समाजामध्ये वेगळे चित्र निर्माण झाले होते. मात्र अखेर आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी आझाद मैदानात येऊन मनोज जरांगे पाटील यांच्या आठ पैकी सहा मागण्यांचे प्रस्ताव मान्य करून त्याबाबतचे अध्यादेश काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण सुटले. उपोषण सुटल्यानंतर मनोज तरंगे पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कौतुक केले त्यांनी आपल्यासाठी खूप मोठ्या गोष्टी केल्याचे कबुली ही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना दिली.त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे सरकारचे संकट मोचक म्हणूनच आज आझाद मैदानात गेले होते असेच म्हणता येईल. कारण मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचे दिवस वाढत चालल्यामुळे मराठा समाज बांधवांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबईमध्ये ठिकठिकाणी मराठा बांधव दिसून येत होते. सरकार समोर एक मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समितीने दिलेले प्रस्ताव मान्य करून मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कौतुक करून त्यांच्या हस्ते उपोषण सोडले आणि उद्या काही दगा फटका झाला तर थेट राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी जाऊन मी बसेल असा इशाराही ममनोज जरांगे पाटील यांनी दिला आणि तो स्वीकारून सरकारकडून मंजूरीसाठी कोणताही दगाफटका होणार नाही असे आश्वासन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिले आणि अखेर संकट मोचक म्हणूनच आज राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका आझाद मैदानावर होती. लाखो मराठे आज उपोषण स्थळावरून शांतपणे मार्गस्थ झाले असून.मराठ्यांनी आज पुन्हा एकदा शिस्तीचे दर्शन घडवून दिले. मराठा पेटला तर काय करू शकतो याची ताकद पुन्हा एकदा राज्याला दिसून आली.