नगर दिनांक 2 फेब्रुवारी – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची आज अहिल्यानगर मध्ये झालेल्या 2024 25 वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा राज्य अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये राज्य कुस्तीगीर संघाच्या उपाध्यक्षपदी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी राज्य कार्याध्यक्ष पै. संदिप भोंडवे, उपाध्यक्ष प्रा. पै. विलासजी कथुरे, पै. हनुमंत गावडे, महाराष्ट्र केसरी पै. बापू लोखंडे, अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव प्रा. डॉ. पै. संतोष भुजबळ आदींसह राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त राज्य उपाध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांचा राज्याध्यक्ष रामदास तडस यांनी सत्कार करून अभिनंदन केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्तीचा ठराव राज्य उपाध्यक्ष संदीप भोंडवे यांनी मांडला त्यास उपाध्यक्ष विलास कथुरे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी आमदार संग्राम जगताप सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले पूर्ण राज्यामध्ये कुस्तीचे नावलौकिक वाढवण्यासाठी तसेच या क्षेत्रामध्ये नवीन पिढीला आणण्यासाठी मी पदाच्या माध्यमातून काम करणार आहे. राज्य कुस्तीगीर संघाच्या उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून चांगले काम करून या क्षेत्राला पुनरवैभव प्राप्त करून देण्यासाठी जास्तीत जास्त काम करणार आहे. राज्य कुस्तीगीर संघाने टाकलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार मानतो.