अहमदनगर दि.२५ मे
अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मदिन सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो मागील वर्षी चौंडी येथे राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मदिन सोहळा पार पडत असताना या ठिकाणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि पोलीस प्रशासनामध्ये मोठा संघर्ष झाला होता. त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. कालांतराने मधल्या काळात राजकीय घडामोडीनंतर राज्यात सत्ता बदल झाल्यामुळे यावर्षी विधानपरिषदेचे भाजपचे आमदार राम शिंदे यांनी हा सोहळा हा शासकीय खर्चातून करण्याची परवानगी मिळवली असून या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार आहेत. मात्र याच वेळेस दरवर्षीप्रमाणे चौंडी या गावात अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त पारंपरिक मिरवणुकीसाठी आणि इतर कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी परवानगी मागितली होती मात्र जिल्हा प्रशासनाने ही परवानगी नाकारल्यानंतर आता आम्ही कसल्याही परिस्थितीत मिरवणूक काढूच असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे या सोहळ्यावरून आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांचा संघर्ष टोकाला गेला आहे.
नियोजनाच्या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना बोलवू नका असे निरोप ही दिले असून प्रशासनावर सरकारचे प्रचंड दडपण असल्याचा आरोपही आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
मागील वर्षी महाविकास आघाडीची सत्ता असताना गोपीचंद पडळकर यांना अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला चोंडीमध्ये प्रवेश करण्यापासून अडवण्यात आले होते त्याचाच बदला यावेळेस भाजप घेतेय अशी चर्चा सध्या जामखेड कर्जत तालुक्यात चालू आहे.