अहमदनगर दिनांक ११ डिसेंबर
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार महिलांच्या हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्त झालेल्या अण्णा वैद्य याची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे. अकोला तालुक्यातील सुगाव गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अकोला तालुक्यातील सुगावमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या जमावानं अण्णा वैद्य याच्या घरावर हल्ला केला. छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असतानाच जमाव आक्रमक झाला. जमावाच्या हल्ल्यामध्ये अण्णा वैद्य गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीनं संगमनेर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले.
दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या अण्णा वैद्य याच्यावर २०११ साली चार महिलांची हत्या केल्याचा आरोप होता. या प्रकरणात जिल्हा न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र त्यानंतर उच्च न्यायालयानं त्याची निर्दोष मुक्तता केली होती.
अहमदनगर जिल्ह्यात खुनाचे प्रकार वाढत असून गेल्या सहा महिन्यात जवळपास पाच खून होण्याचे प्रकार अहमदनगर जिल्ह्यात घडले आहेत.