अहमदनगर दि.१० डिसेंबर
नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी सुरू असलेल्या फॉरेन्सिक ऑडिटचा सुमारे एक हजार पानांचा अंतिम अहवाल आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर करण्यात आला आहे. यात संशयित कर्ज प्रकरणाच्या तपासणीत संचालक मंडळ, कर्ज शिफारस करणाऱ्या अधिकाऱ्यांची समिती व कर्जदार, यापैकी कोणाचा, कोणत्या प्रकरणात, काय सहभाग आहे, याची माहिती समोर आली आहे. तसेच, कर्ज रकमा कोणापर्यंत पोहोचल्या, हेही या अहवालात स्पष्ट झाले आहे.
रखडलेला फॉरेन्सिक ऑडिट अहवाल अंतिम करण्याचे काम सुरू झाले. असून सुमारे 28 कर्ज प्रकरणे व आर्थिक व्यवहारांच्या तपासणीत कोणाच्या चुका आहेत, रकमा कोनापर्यंत पोहोचल्या हे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार अहवाल अंतिम करून फसवणूक प्रकरणात कोण दोषी आहेत, लाभार्थी कोण आहेत, यांच्या नावांसह अंतिम अहवाल आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर झालेला आहे.
दरम्यान फॉरेन्सिक अहवालात यापूर्वीच अनेक बाबी समोर आलेल्या आहेत. कर्ज रकमांचा गैरवापर झाल्याचेही स्पष्ट झालेले आहे. फॉरेन्सिक अहवाल हा या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा असून, त्यानुसार पोलिसांकडून कोणत्याही क्षणी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अनेकांनी देव पाण्यात ठेवून आपले नाव यामध्ये येऊ नये असे प्रार्थना सुरू केली असेल कारण या घोटाळ्यात अनेक मत्तबर लोकांची नावे असून याची यादीही फार मोठी असल्याचे समजतेय.