पुणे दि.२१ मे
पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांचे समर्थक नीलेश माझीरे यांच्यासह १५ ते २० कार्यकर्ते मनसे सोडणार असून, शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. या चर्चेला स्वतः नीलेश माझीरे यांनी पूर्णविराम दिला आहे. यासंबंधी नीलेश माझीरे यांनी स्वतः फेसबुक पोस्ट शेअर केली असून, मी मनसेतच राहणार असल्याचे सांगितले आहे.
माझीरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ”काल रात्रीपासून काही वृत्तवाहिन्यांवर माझ्याविरोधात बातम्या प्रसारित होऊ लागल्या आहेत. मी शिवसेनेत प्रवेश करतो असे दाखवले जात आहे. पण मी फेसबुकद्वारे सर्व महाराष्ट्र सैनिकांना सांगू इच्छितो की, मी काही दिवसांपूर्वी स्वारगेट येथील कबड्डी स्पर्धेनिमित्त गेलो होते. त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते सचिन आहेर आले होते. त्यांना मी पुष्पगुच्छ देतानाचा व्हिडिओ काल रात्रीपासून व्हायरल होत आहे. पण मी शिवसेनेत प्रवेश करत आहे असे कुठेही बोललो नाही. मी वसंत मोरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडणार नाही.”