.अहमदनगर दि.११ ऑक्टोबर-
अहमदनगर महानगरपालिकेच्या कचरा घोटाळ्याचे प्रकरण चालु असतानाच हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी गेले असुन लगेच नगर शहारत बनावट बांधकाम परवाना प्रकरण उघडकीस आले आहे. तर आता पुन्हा एकदा महानगरपालिकेचा नगररचना विभागा चर्चेत आला आहे. अहमदनगर शहरातील आनंदधाम परिसराच्या लगत सुरू असलेल्या बांधकामाबाबत पुन्हा एकदा नगररचना विभाग आणि आयुक्त वादात सापडले आहेत. याबाबत नगर शहरातील विशाल वालकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तक्रार देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीत श्री.साई आनंद रियालिटी या फर्मच्या माध्यमातून पितळे, मुथा आणि अग्रवाल यांच्या भागीदारीत मोठी इमारत बांधली आहे. यासाठी त्यांनी महानगर पालिकेतील नगररचना विभागातून इमारतीचा बांधकाम परवाना 18 मे 2018 साली घेतला आहे. या बांधकाम परवानगी बाबत नगर रचना विभागाने प्लॉटचे क्षेत्रफळ २२९९.०४ चौ.मी असून त्याला प्रिमियम ३० टक्के नुसार ६६५.७१ एवढा देणे अपेक्षीत होते. मात्र मनपा नगररचना विभागाने ९९५.९० एवढा प्रीमियम दिला आहे. तसेच ३३०.१९ प्रिमियम बेकायदेशीर ज्यादा दिलेला असून व टीडीआर करिता या प्लॉटचे क्षेत्रफळ २२१९.०४ चौ.मी असताना त्याला ०.६५ टक्के नुसार १४४२.३७६ मिळणे अपेक्षीत होता मात्र नगर रचना विभागाने २१५७.८० एवढा दिला. म्हणजे ७१५.४२४ एवढा टीडीआर बेकायदेशीर ज्यादा दिलेला आढळून आलेला आहे. या मंजुरीला प्रिमियम ३३०.१९ + टीडीआर ७१५.४२४ = १०४५.६१४ बिल्टअप एरीया ज्यादा बेकायदेशीर दिलेला आहे. त्या नुसार १०४५.६१४ X १०.७६४ = ११,२५४.५८ चौ.फुट प्रिमियम व टीडीआरला बेकायदेशीरपणे मंजुरी दिलेली आहे. बांधकाम व्यावसायिकाशी संगणमत करून महानगर पालिकेने त्याच्यावर ही मेहरबानी केल्याची दिसून येत आहे. नगर शहरातील मोक्याच्या ठिकाणी आनंद धाम परिसरात इमारत असून त्याचे बाजार मुल्य अंदाजे ३० कोटी रुपयांच्या पुढे जाते.मात्र त्या बांधकाम व्यावसायिकाने आणि त्याच्या भागीदारांनी महानगरपालिका नगर रचनाविभागातील अधिकारी
यांना हाताशी धरुन शासनाचे व महानगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान केले असून स्वतःचा वैयक्तिक फायदा करून घेतल्याचे निदर्शनास येत आहे.
त्यामुळे या भ्रष्टाचाराबाबत विशाल संजय वालकर यांनी मुंबई येथील नगर विकास खाते तसेच नाशिक येथील नगर रचना विभाग पुणे येथील संचालक नगररचना विभाग आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांकडे तक्रार दाखल केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन नगर विकास विभागाने नगर रचना विभाग नाशिक विभाग यांना संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि त्यासंदर्भात नाशिक विभागाने अहमदनगर महानगरपालिकेला ४ फेब्रुवारी २०२१ रोजी या प्रकरणाची कागदपत्रे तात्काळ नाशिक विभागाकडे पाठवावी असा आदेश दिला होता. त्या बाबत नाशिक विभागाने अनेक स्मरणपत्रे नगर रचना विभागाला दिले होते मात्र नगर रचना विभागाने संपूर्ण फाईल नाशिक विभागाकडे पाठविण्या करिता चालढकल करत होते. मात्र या संदर्भात विशाल वालकर यांनी 20 ऑगस्ट 2021 रोजी महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे अर्ज दाखल करून अभिप्राय देण्याबाबत मागणी केली होती. महानगरपालिकेने या अर्जाची दखल घेऊन 13 डिसेंबर 2021 रोजी आयुक्तांच्या सहिनीशी अभिप्राय विशाल वालकर यांना दिला होता. या अभिप्रायामध्ये नगर रचनाविभाग यांनी मंजुर रेखांकन हे रेरा पद्धतीने अंतिम मंजुरी ही ड वर्ग महानगरपालिका विकास नियंत्रण नियमावलीमधील नियम क्र. २४.९- ii व iii नुसार देण्यात आली आहे. अशा मजकुराचा चुकीचा व नियमाचे उल्लंघन करुन अभिप्राय विशाल वालकर यांना देण्यात आला होता.
या संदर्भात विशाल वालकर यांनी नाशिक येथील नगररचना विभागात 25 जानेवारी 2022 रोजी तक्रार केली आहे. या तक्रारीची अद्याप सुनावणी पूर्ण झालेली नसून अंतिम कोणताही निकाल नगररचना विभागाने दिलेला नसताना 28 जून 2022 रोजी श्री.साई आनंद रियालिटीच्या भागीदारांनी महानगरपालिकेत भोगावटा पत्रक(कम्प्लीशन ) मिळवण्यासाठी २८ जून २०२२ रोजी अहमदनगर महानगरपालिकेत कागदपत्रे सादर केली होती. मात्र या अर्जाची छाननी करून महानगरपालिका नगररचना विभागाने 25 ऑगस्ट 2022 रोजी काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्यामुळे भोगवटा प्रमाणपत्र देता येणार नाही असे लेखी श्री.साई आनंद रियालिटीच्या भागीदारांना कळवले होते. त्यानुसार विशाल वालकर यांनी महानगरपालिकेचा फायदा होऊन बेकायदेशीर काम होऊ नये म्हणून बाबत पाठपुरावा सुरू ठेवला होता. महानगरपालिका तसेच तत्सम संबंधित विभागाशी त्यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून म.प्रा.व न.२ अधिनियम १९६६ चे कलमानुसार मंजुरी रद्द करुन भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी केली होती. मात्र विशाल वालकर यांनी महानगरपालिका तसेच नाशिक विभाग नगर रचना विभागाकडे तक्रार केल्या असताना आणि या तक्रारीचा अंतिम निर्णय येणे प्रलंबित असतान अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्त पंकज जावळे यांनी व्यावसायिकास फायदा होण्यासाठी श्री.साई आनंद रियालिटीच्या इमारतीच्या बांधकामाचे प्रकरण स्वतःकडे मागवुन घेतले व नवीन यु.डी.सी.पी.आर.च्या नियमांचे उल्लंघन करुन इमारत भोगवटा प्रमाणपत्र छाननी अहवाल केला व श्री.साई आनंद रियालिटीच्या भागीदारांबरोबर आणि महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांबरोबर संगणमत करून सदर प्रकरणातील प्रस्तावाला 7 ऑक्टोबर रोजी मान्यता दिली.
त्यामुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सर्व दोषी व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी विशाल वालकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
हे प्रकरण विशाल वालकर यांनी उघडकीस आणले असले तरी अशा प्रकारे अनेक प्रकरणे अहमदनगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातून धक्कादायक गोष्टी घडल्या आहेत. कागदावर एक क्षेत्रफळ दाखवणे आणि नंतर त्या क्षेत्रफळात बदल करणे यु.डी.सी.पी.आर.नियमांचे उल्लंघन करून बांधकाम मंजुरी व भोगवटा प्रमाणपत्र दिले आहेत व देत आहेत.असा आरोप विशाल वालकर यांनी केला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक व लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली असून तसेच औरंगाबाद हायकोर्ट मध्ये बांधकाम व भोगवटा प्रमाणपत्रांमध्ये झालेल्या गैरकारभाराबाबत याचिका दाखल करणारअसल्याचे निवेदनात म्हटले आहे.