अहमदनगर दि.२९ डिसेंबर
अहमदनगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथे नाट्यगृहाचे काम गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून सुरू आहे. आता हे काम अंतिम टप्प्यात आले असून या नाट्यगृहाच्या परिसरातील काही जागा महानगरपालिकेने भाडेकरारने देऊन त्या ठिकाणी पक्के बांधकाम सध्या सुरू आहे. ही जागा महानगरपालिकेने भाडे कराराने देताना कोणत्या नियमानुसार दिली असून महानगरपालिकेच्या नियमानुसार तेथे पक्के बांधकाम करता येते का? जर हे काम नियमबाह्य असेल तर हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू असून हे काम त्वरित थांबवावे अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे आणि शिवसेनेचे काका शेळके यांनी महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महानगरपालिकेच्या ज्या मोकळ्या जागा आहेत, त्या महानगरपालिकेच्या ताब्यात ठेवाव्यात, नाहीतर
भविष्यात अशा अनेक जागा महानगरपालिकेने गोरगरीबांना भाडे तत्वावर दिलेल्या आहेत, त्यावर
देखील मग पक्के बांधकाम करण्यास परवानगी द्यावी. सर्वांना नियम सारखा लावावा. नाहीतर
आता चालू असलेले बांधकामावर त्वरीत कारवाई करून ज्या कोणाला ही जागा दिलेली असेल तो
करारनामा रद्द करावा व संपुर्ण नाट्यगृहासाठी ती जागा आरक्षित ठेवावी, व जो कोणी बांधकाम
करत असेल व ज्या कोणी अधिका-याने या विनापरवाना बांधकामाला परवानगी दिलेली असेल
नियमाबाहेर जावुन त्यांच्यावर सोमवारपर्यंत कारवाई व महानगरपालिकेची फसवणूक केल्याबद्दल
गुन्हा दाखल करावा. नाहीतर मंगळवार दिनांक ०२-०१-२०२४ रोजी आम्ही त्या गाळ्यांसमोर सर्व
नागरिकांना घेवुन आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.