अहमदनगर दि .११ डिसेंबर
: नगर शहरात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांनी आबाल वृद्ध, युवती बालक याना चावा घेऊन उच्छाद मांडलेला असताना पीपल्स फॉर ऍनिमल ने विकतचे डॉग बर्थ ऑर्गन जमा करून पालिकेच्या पशु वैद्यकीय विभागाकडून लाखोंची बिले हडप केली आहेत. पालिकेचे अधिकारी, ठेका देणारी छाननी समिती आणि तपासणी समिती या घोटाळ्यात सामील आहे. या घोटाळ्यासंबंधीची ऑडिओ क्लिपच नगर शहर शिवसेनेचे नेते आणि युवासेनेचे सह सचिव विक्रम अनिलभैय्या राठोड यांच्या हाती लागली आहे. त्यामुळे संबंधित पीपल्स फॉर ऍनिमल संस्थेचे ठेकेदार व्यक्ती, पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर पालिकेची फसवणूक आणि लाखो रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी विक्रम राठोड यांनी केली आहे.
पीपल्स फॉर ऍनिमल ही संस्था शहरात गेल्या दोन वर्षांपासून कुत्रा निर्बीजीकरणाचा ठेका पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मॅनेज करून चालवत आहे. प्रत्यक्षात एकही कुत्रा ही संस्था पकडत नाही. फक्त कागदोपत्री कुत्रे पकडून निर्बीजीकरणाचे काम केल्याचे दाखवले जाते. आणि विकतचे डॉग बर्थ ऑर्गन पालिकेत जमा केले जातात आणि बिले काढली जातात. मागील वर्षी या संस्थेला लाखो रुपयांची अशीच बोगस बिले टक्केवारी घेऊन अदा झाली. तोच गोरख धंदा या वर्षी देखील सुरु आहे.
पीपल्स फॉर ऍनिमल च्या खन्ना मॅडम आणि एका अनोळख्या व्यक्ती चा फोन कॉल रेकॉर्डिंग शिवसेनेच्या हाती लागले आहे. यात ही खन्ना मॅडम आपण विकत घेतलेले डॉग बर्थ ऑर्गन कसे आपल्या कर्मचाऱ्यांनी चोरले. आणि परत आपल्याला आपलेच चोरलेले २०० बर्थ ऑर्गन अवघ्या ३० हजार रुपयात कसे विकत दिले. आणि मग हा प्रकार रोखण्यासाठी आपण काय शक्कल लढवली याचा सपशेल कबुली जबाब खन्ना हिने या संभाषणात दिला आहे.
पहा ती ऑडियो व्हिडिओ क्लिप👇.
या पुराव्याचा आधार घेत ही पालिकेची आणि नगर करांची धडधडीत फसवणूक असल्याचे यातून सिद्ध होते आहे. नगर शहरातील कुत्री निर्बीजीकरणाच्या ठेक्या नुसार एका कुत्र्याचे निर्बिजीकरण केल्यानंतर पालिका त्यामागे प्रत्येकी ८०० रुपये ठेकेदार संस्थेला अदा करते. म्हणजे खन्ना बाईने विकत घेतलेले त्यांचेच चोरलेले २०० डॉग बर्थ ऑर्गन त्यांनी पालिकेत जमा केले आणि त्यापोटी प्रत्येकी ८०० रुपये × २०० डॉग बर्थ ऑर्गन प्रमाणे १ लाख ६० हजार रुपये हडप केले म्हणजे 30000 रुपयात डॉग ऑर्गन विकत घ्यायची आणि ते 1,60,000 रुपयात विकायचे . जागेवर 1,30,0000 रुपये प्रॉफिट….. यावर्षीचा ठेका संबंधित संस्थेला ३ महिन्यासाठी देण्यात आला आहे. प्रतिमहिना ३ लाख रुपये खर्चाचा अंदाज आहे. एकूण बिल ३ महिन्यात ९ लाख रुपयांचे आहे. हे सर्व पैसे ठेकेदार संस्थेने विकत घेतलेले डॉग बर्थ ऑर्गन जमा दाखवून अदा होतील. आणि या संस्थेला पालिकेत एंट्री देणारा आमदारांचा बगलबच्चा , पालिकेचे अधिकारी, आरोग्य विभागातील कर्मचारी हे पैसे आपसात वाटून घेतील. पण इकडे मोकाट कुत्र्यांच्या हैदोसा पायी नगर कर रात्री अपरात्री आणि दिवसा सुद्धा जीव मुठीत धरून वावरत आहेत. किमान माणुसकीचा विचार करून तरी पालिका अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी या विषयात जातीने लक्ष घालावे आणि या घोटाळ्यात सहभागी सर्वाना गुन्हा दाखल करून धडा शिकवावा. चांगल्या संस्थेला श्वान निर्बीजीकरणाचा ठेका देऊन नगरकराचा श्वास मोकळा करावा अशी मागणी विक्रम राठोड यांनी केली आहे.