मुंबई 26 जून
शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आज पाचवा दिवस उजाडला आहे. शिवसेनेनं कारवाईची तयारी सुरू केल्यामुळे शिंदेंच्या गोटात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे, राज्यपाल कोश्यारी आज राजभवनावर दाखल होणार आहे. त्यामुळे शिंदेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एकनाथ शिंदे हे गेल्या पाच दिवसांपासून 38 आमदारांना घेऊन गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. आज दुपारी 12 च्या सुमारास एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ आणि आमदारांमध्ये सल्लामसलत होणार आहे. विधानसभा उपाध्यक्षाकडून गटनेता आणि प्रतोद नियुक्तीचा निर्णय न झाल्यामुळे ही बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे आता गटनेता नियुक्तीचा वाद हा आता राज्यपालांकडे जाण्याची शक्यता आहे.