अहमदनगर दि२४ डिसेंबर
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे बस सोडत नसल्याने संतप्त विद्यार्थिनींनी तारकपूर बस स्टॅन्ड समोर रस्ता रोको आंदोलन केले होते. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून विद्यार्थिनींसाठी बस उपलब्ध करून दिल्यानंतर वातावरण निवळले.
अहमदनगर शहरातील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात अहमदनगर जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून मुली शिक्षणासाठी रोजच बसने ये जा करत असतात विशेषतः राहुरी तालुक्यातील वांबोरी या गावाच्या आसपास परिसरातील अनेक विद्यार्थीनी या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. मात्र वांबोरी साठी एसटी महामंडळ गाडी वेळेवर सोडत नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून विद्यार्थ्यांची घरी जाण्यासाठी कुचंबना होत आहे. आज दुपारी तीन वाजल्यापासून अनेक विद्यार्थिनी एसटी स्टँडवर बसची वाट पाहत थांबल्या होत्या मात्र सायंकाळचे साडेसात वाजले तरी एसटी महामंडळाने वांबोरी साठी बस सोडली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी ताराकपूर बस स्टॅन्ड समोर रस्ता रोको करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. दुपारपासून या विद्यार्थिनी बस कधी लागेल यासाठी विचारणा करत होत्या मात्र त्यांना दर पंधरा मिनिटाला सांगून सुमारे तीन ते चार तासापासून ताटकळत ठेवल्याने या विद्यार्थिनी संतापल्या होत्या
रस्ता रोको झाल्याचे कळताच या घटनेचे गांभीर्य ओळखत तोफखान पोलिसांनी तातडीने तारकपूर स्टँड वर धाव घेत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ वांबोरी साठी बस उपलब्ध करून देण्याची विनंती केली आणि त्यानंतर या संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेतले.