नगर दिनांक २४ फेब्रुवारी-
भारताची अडीच तीन हजार वर्षाची समतेची, एकोपाची, बंधू – भावाची इतकी चांगली परंपरा आहे की या देशाचा आदर जवळपास सर्व देशांनी घेतला आहे. महाराष्ट्राच्या एकोप्याचे वातावरण कधी बिघडू शकणार नाही या देशातील संतांनी प्रथम कोणाचा आदर्श घेतला असेल तर बाहेरून आलेल्या सुफी संतांचा आदर्श घेतला. त्यामुळे समता, बंधुभावाचा विचार सर्व धर्मीयांच्या मनात जागविला असे विचार परभणी येथील हभप धर्मकीर्ती महाराज यांनी व्यक्त केले.
अहिल्यानगर येथील सावित्री फातिमा सदभावना मंच आयोजित सर्वधर्मीय संमेलनात हभप धर्मकीर्ती महाराजांनी राजकारणी लोकांनी जे धर्मयुद्ध सुरू करून जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम केले त्या विषयावर परखड प्रभावीपणे आपल्या खास शैलीत समाचार घेतला.
सावित्री फातेमा सद्भावना मंचाच्या वतीने सर्व धर्मीय सदभावना संमेलनाचे सैनिक लोन नगर येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार निलेश लंके, ज्येष्ठ कीर्तनकार पारनेर येथील ह.भ.प. सोपानकाका औटी महाराज, सत्यपाल महाराज शिरसोलीकर, परभणी येथील ह.भ. प.धर्मकीर्ती महाराज सावंत, पारनेर येथील भंते बाळासाहेब पातारे,हभप भारत महाराज जाधव पंढरपूर,जळगाव येथील मौलाना समी, प्रा.सौ.स्मिताताई पानसरे, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, बाळासाहेब मिसाळ, मुकुंदराव सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्री फातिमा सद्भावना विचार मंचाचे अध्यक्ष एडवोकेट संभाजी बोरुडे होते.
सदर प्रसंगी सत्यपाल महाराज यांना राज्यपातळीच्या सद्भावना पुरस्काराने शाल सन्मानचिन्ह व 11 हजार रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले.
हभप धर्मकीर्ती महाराज पुढे म्हणाले सुफींने अस्पृश्यांना जवळ केले वर्षे व्यवस्था जातीव्यवस्था यावर प्रकाश टाकीत सर्व धर्मीयांना सामाजिक एकतेचा संदेश दिला. भागवत भक्ती धर्मा अगोदर सुफींचे आगमन होते. प्रचंड जातिवाद अस्पृश्यता परिस्थिती होती. अशावेळी सुफी साधुसतांनी समता बंधू भावनेचा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत केला. जनार्दन स्वामी एकनाथ महाराज हे विठ्ठलाला मानतात तुकोबाराया हे सुफींना मानतात त्यांचे अभंगातून त्यांनी एक ओळ सांगितली त्याची लोककथा सांगून तुकाराम महाराजांची दिंडी एका मस्जिद मधे थांबली असता तेथील मुस्लिमांनी तुकाराम महाराजांना मस्जिदी मधे कीर्तन करण्यास सांगितले. त्यावेळी तुकाराम महाराज म्हणाले. अल्ला देवे, अल्ला दिलाये ,अल्ला खिलाये अशी ओवी सांगितली हे एकेश्वर सांगणारे महत्त्व त्यांनी विशद केले.
यावेळी खासदार निलेश लंके म्हणाले की समाजामध्ये द्वेशाचे प्रमाण दिवसा दिवस वाढत चालले आहे.आजच्या परिस्थितीत सदभावनेच्या कार्यक्रमांची अत्यंत आवश्यकता आहे. छत्रपतींच्या हिंदुत्वाची आज खरी गरज आहे. आज सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या संमेलनाची वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. आजच्या संमेलनाचे हेतू सर्वदूर घराघरात पोहोचायला हवे. त्यासाठी त्यांनीही असे संमेलन भविष्यात आयोजित करण्याचे माणस केले.
प्रास्ताविक करताना डॉ. रफिक सय्यद म्हणाले की भारतीय समाज अठरापगड जाती धर्मांचा समाज आहे. अर्थातच या समाजामध्ये परस्पर सदभावना सलोखा बंधुभाव अनिवार्य व परम महत्त्वाचा आहे. त्याशिवाय देशात शांती सुख-समृद्धी नांदणार नाही. सुदैवाने भारतासह महाराष्ट्राला व अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्याला सदभावनेचा महान वारसा लाभला आहे. येथील सुफी हजरत शाह शरीफ बाबां विषयी मालोजीराजे भोसले यांना परम आदर होता. म्हणूनच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे अनुक्रमे शहाजी व शरीफ जी अशी ठेवली होती. आजही शाहशरीफ बाब हे भोसले घराण्याचे श्रद्धास्थान आहे. श्रीगोंदाचे सुफी शेख मोहम्मद (रह.) संत शेख महंमद महाराज व संत तुकाराम महाराजांचे घनिष्ठ संबंध सर्वज्ञात आहेत. संत शेख मोहम्मद महाराज श्रीगोंदा आणि पंचकोशीतील लोकांचे श्रद्धास्थान आहे. सावित्रीबाई फुले आणि फातेमा शेख या शहरातील क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या विद्यार्थिनी आहेत. हाच परस्पर सदभावनेचा बंधुत्वाचा व प्रेमाचा वारसा जोपासण्यासाठी व आणखी वृद्धींगत करण्यासाठी सर्व धर्मीय सद्भावना संमेलन आयोजित केले आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी सत्यपाल महाराज म्हणाले की आज प्रत्येकाला जागरूक व्हावे लागेल. समाजातील सदभावनेसाठी काम करणारे लोकांनवर हल्ले होतात. कारण सदभावनेसाठी काम करणाऱ्यांच्या विचारांना त्यांना मारायचे आहे. पण विचार मरत नाही, ते अशा सद्भावना कार्यक्रमाद्वारे इतरांमध्ये पसरत असतात. माणसाला माणूस बनवण्याचा कारखाना सावित्री फातिमा सद्भावना विचार मंचाद्वारे तयार होत आहे असे सांगितले.
जळगावहून आलेले मौलाना समी म्हणाले की युवा पिढीला दिशाभूल करण्याचं काम सध्या सुरू आहे. त्या युवा पिढीला आपल्याला सत्यमार्ग दाखवावा लागेल. धर्म व इतिहासाचे विकृतीकरण पण थांबविण्याची आज अत्यंत आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कॉम्रेड स्मिता पानसरे यांनी आपल्या भाषणातून सांगितले सदभावना मंच हे सर्वांना एकत्र आणण्याचे काम करीत आहे. अस्वस्थ वर्तमान काळात राजरोसपणे धर्माचा आणि सत्तेचा वापर करून दहशत निर्माण करून जाती जाती तेढ निर्माण केली जात आहे. अशा वातावरणात न घाबरता हे संमेलन ठेवल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देत त्या म्हणाल्या प्रश्न संकटे आव्हानांची माहिती आहे, ती परतून लावण्यासाठी संघर्ष करून प्रश्न काय आहे त्याची वेळीच उत्तरे दिली तर ते सुटतात,त्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.सावित्री फातेमा सदभावना मंच यामधील एका शब्दाला अनेक जण विरोध करताना दिसतात सावित्रीच्या पुढे जर बहिणाबाई जनाबाई असे असते तर गजारावर झाला नसता, फातेमाला कथोकल्पित पात्र आहे हे कोणीतरी आणल आहे असा कांगावा केला जातो. बहुजनांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे. धर्मसत्ता राजसत्ता हे काम करताना दिसत आहे. खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्या माणसाच्या वतीने सर्वांचे आहे. फातिमा ही होतीच त्याचा इतिहास आहे, पुरावा आहे. सावित्रीमाईंनी महात्मा फुले यांना लिहिलेले पत्र आहे ते आजही पुरावा म्हणुन आहे. सावित्रीबाई या आजारी असताना शाळेची जबाबदारी फातेमा यांच्यावर सोपवण्यासाठी महात्मा फुलेंना पत्र लिहिले होते. ती जबाबदारी फातेमा यांनी पार पाडली असे असताना त्यांचें नाव कथाकल्पित आहे असे म्हणणे चुकीचे आहे. असे सांगितले.
भंते बाळासाहेब पातोरे म्हणाले की राज्यघटना उध्वस्त करण्याचा काम सध्या होत आहे. त्याला वाचविण्याची गरज असून संविधानाने दिलेल्या अधिकाराची लोकांना जाणीव करून दिली पाहिजे. जेणेकरून लोक सरकारला जवाब विचारू शकते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना एड. संभाजी बोरुडे म्हणाले की संविधानाला अपेक्षित असणाऱ्या भारताच्या निर्माण साठी सदभावना मंच प्रयत्नशील आहे. सदभावना असणारा हा जिल्हा असून येथे शाहशरीफ दर्गा आहे. सावित्री फातिमाची शाळा आहे.अशा जिल्ह्यात सदभावनेसाठी काम करण्याची वेळ का आली, यावर विचार मंथन करावे लागेल. मानवता धर्म आज खतरयात आहे. जातीला महत्त्व दिले जात आहे. मूठभर लोक हे कार्य करत आहे व अडाणी व इतिहास भुगोल माहिती नसणारी माणसं त्यांच्या मागे जात आहे. ही फार दुर्दैवी बाब आहे. आजच्या या शिक्षित समाजात अशा भेदभाव करणारी प्रवृत्ती फोपावत आहे हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. व भविष्यात आम्ही सतत या मंचाद्वारे सद्भावनेचे कार्य चालू ठेवु अशी त्यांनी ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावित्री फातिमा सद्भावना विचार मंचाचे एडवोकेट संभाजी बोरुडे, अशोक सब्बन, बाळासाहेब मिसाळ, संजय झिंजे, युनूसभाई तांबटकर, मुबीन खान, मेजर संजय वाघ,प्रतिक बारसे, फिरोज शेख, राजूभाई शेख, मुकुंदराव सोनटक्के, प्रा. डॉ. मेहबूब सय्यद, मुस्ताक सर तांबटकर, अब्दुल रहीम साहब, बापू चंदनशिवे, कादीर सर, जहीर सय्यद पत्रकार, मेजर रफीक, अश्फाक शेख, मुनाफ भाई, एड.आरिफ भाई, नदीम भाई, मुश्ताक भाई आदिंनी भरपूर परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक सब्बन यांनी केले. तर आभार प्रतिक बारसे यांनी मानले.