पुणे दि.१० ऑक्टोबर
भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री आणि नुकतेच विधान परिषदेवर निवडून गेलेले आमदार राम शिंदे राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. राम शिंदे कर्जत जामखेडचे आमदार होते मात्र मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून रोहित पवार आणि राम शिंदे हे एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही.यामध्ये साता एक नवीन आरोप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मालकीचा असलेल्या कारखान्यावर केला आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती ॲग्रो लिमिटेड या साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनीसाखर आयुक्तांकडे निवेदन देऊन केली आहे.
राज्यातील साखर कारखान्यांनी १५ ऑक्टोबर २०२२ पूर्वी ऊस गाळप हंगाम सुरू केल्यास संबंधित साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश नुकतेच साखर आयुक्तालयाने जारी केले होते.या आदेशानुसार सन २०२२-२३ या चालू वर्षीच्या गाळप हंगाम दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू करावा, असा निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत झालेला आहे. जे कारखाने गाळप हंगाम दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ पूर्वी गाळप सुरू करतील अशा कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीच्या दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या सभेत देण्यात आलेले आहेत. दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ पूर्वी कारखाना सुरू केल्यास महाराष्ट्र राज्य साखर कारखाने (क्षेत्र आरक्षण व गाळप आणि ऊस वितरण नियमन) आदेश, १९८४ खंड ४ चा भंग होतो मात्र या सर्व सर्व आदेश आणि अटी शर्तीकडे बारामती ॲग्रो लिमिटेड या साखर कारखान्याने दुर्लक्ष करून या वर्षीचा गाळप हंगाम दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ पूर्वी सुरू करून कायद्याचा भंग केलेला आहे.
त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करून आणि आदेशाची पायमल्ली केली असल्याचे दिसून येत असल्याने बारामती ॲग्रो लिमिटेड, शेटफळगडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांच्या कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर,मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी राम शिंदे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे समक्ष भेटून केली आहे.