अहिल्यानगर दिनांक 29 मे
शहरातील बसस्थानका बाहेर बेशिस्त वाहनांच्या पार्किंग मुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. बस आत आणताना तसेच बसस्थानकातून बाहेर पडताना कसरत करावी लागते. या ठिकाणी वाहने पार्क करू नयेत, अशा सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र, वाहनचालकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याच प्रमाणे शहरातील विविध चौकात वाहतूक कोंडी रोजच होत आहे.मात्र याकडे शहर वाहतूक शाखेचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.
बसस्थानकना बाहेरील बेशिस्त पार्किंगचा प्रश्न आजही कायम आहे. माळीवाडा बसस्थानकाबाहेर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे येथे कामयच वाहतूक कोंडी होत असते. या रिक्षांच्या गराड्यातून वाट काढताना बसचालकांना कसरत करावी लागते. त्याच प्रमाणे पुणे बस स्थानका बाहेर रिक्षासह पुणे मुंबई, छत्रपतीसंभाजीनगर, या ठिकाणी जाणाऱ्या खाजगी बस आणि इतर चारचाकी वाहने प्रवाशांसाठी उभ्या असतात त्यामुळे या ठिकाणी रोजच वाहतूक कोंडीचा सामना नगरकरांना करावा लागतो.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक निवेदन देऊन वाहतूक कोंडीबाबत पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याबाबत कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसांपूर्वी पोलीस प्रशासन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन वाहतूक कोंडी समस्या सोडण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते मात्र याला 24 तास होऊनही वाहतूक समस्या आणि वाहतुकीची कोंडी कायम आहे.
नगर शहरातील तिन्ही बसस्थानकांत ही समस्या कायम आहे. तारकपूर बसस्थानकात दुचाकींप्रमाणेच चारचाकी वाहने देखील पार्क केली जातात. स्वस्तिक बसस्थानकातही गेटच्या जवळच दुचाकी वाहने पार्क केली जात आहेत. या बसस्थानकाबाहेर प्रवासी वाहतूक करणारी खासगी चारचाकी वाहने, ट्रॅव्हल्स उभ्या असतात. त्यामुळे येथेही वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या वाहनांवर कारवाई केली जाते. मात्र, काही वेळातच वाहने पुन्हा येथे येतात.
नो पार्किंग कागदावरच
बसस्थानकांच्या दोनशे मीटर परिसरात खासगी वाहने लावण्यास मनाई आहे. या परिसरात ‘नो पार्किंग झोन’ तयार करण्यात आले असले तरी कुठेही या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. बसस्थानकांना खासगी वाहनांचा गराडा पडला आहे. याचा सर्वाधिक त्रास जाणार येणाऱ्या नागरिकांना आणि एसटीला होत असला तरी कारवाई करण्याचे अधिकार नसल्याने अधिकारी हतबल झाले आहेत. बसस्थानकांपासून दोनशे मीटरचा परिसर ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषीत केला आहे. या परिसरात कोणतेही खासगी वाहन उभे करता येत नाही. असे असले तरी या आदेशाची अंमलबजावणीच होत नाही.