अहिल्यानगर दिनांक 29 मे
जिल्हा पोलिस दलात नेहमीच मोठी उत्सुकता असलेल्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात बुधवारी 28 तारखेला जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या देखरेखीखाली जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या पॅनलद्वारे प्रशासकीय आणि विनंती बदल्यांची प्रक्रिया पार पाडण्यात आली.
बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करून त्यांना तात्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश आहेत. पोलीस शिपाई ते सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावरील या बदल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर 190 बदल्या होत्या. त्यातील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना एक वर्ष स्थगिती देण्यात आली आहे. तर आंतरजिल्हा बदली असलेल्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.
बदलीसाठी अनेक महिन्यांपासून कर्मचारी प्रतिक्षेत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हे बदल्यांचे गॅजेट काढतील अशी अपेक्षा अनेक जणांना होती. मात्र निवडणुका आणि इतर कारणांमुळे बदल्यांचे गॅजेट त्यावेळी निघू शकले नाही. त्यामुळे अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बदल्या झाल्या असून नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार घेताच सुरुवातीला कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न सोडवला आहे. आता प्रतीक्षा लागली आहे ती जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्यांच्या आदेशाची ती प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल अशीही माहिती समोर येत आहे.
बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ आपल्याकडील प्रलंबित तपास, गुन्हे, अर्ज, प्रकरणे चार्ज यादीसह ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करावयाचा आहे. तसेच त्याच दिवशी कार्यालयीन कामकाज पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यास बदलीच्या ठिकाणासाठी कार्यमुक्त करावे लागणार.
तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश प्रभारी अधिकाऱ्यांना असून तसे न केल्यास प्रभारी अधिकाऱ्यावर कडक शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येणार आहे. याकामी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी प्रक्रियेवर लक्ष द्यावे लागणार आहे.