Home राजकारण किरण काळेंची आमदार संग्राम जगताप यांना अनोखी भेट

किरण काळेंची आमदार संग्राम जगताप यांना अनोखी भेट

अहमदनगर दि. १० फेब्रुवारी

काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.संग्राम जगताप यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र भेट पाठविले आहे. त्याच बरोबर धर्मवीर संभाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांवरील पुस्तके भेट दिली असून महापुरुषांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करण्याचा सल्ला काँग्रेसने आमदारांना दिला आहे.

कुरियरद्वारे ही भेट काँग्रेसने आमदारांच्या आयुर्वेद महाविद्यालयाच्या आवारात असणाऱ्या संपर्क कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवली आहे. यामध्ये गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता ? इतिहासकार डॉ.जयसिंगराव पवार यांचे शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे ?, शिवछत्रपती – एक मागोवा या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकांचा समावेश आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेल्या धर्मवीर संभाजी महाराजांवरील ‘छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ’ काँग्रेसने त्यांना दिला आहे.

महामानव, घटना शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलेल्या ‘माझी आत्मकथा’ हे पुस्तक काँग्रेसने आमदारांना उपलब्ध करून दिले असून यामध्ये आंबेडकरांचे निवडक संपादित लेख आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ त्याचबरोबर फुले यांचा अतिशय गाजलेला ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ देखील काळे यांनी आमदारांना वाचनासाठी उपलब्ध करून दिला आहे.

महापुरुषांवरील साहित्यरुपी भेट देत असताना काळे यांनी आमदारांना जाहीर आवाहन केले आहे की, आपण एक महिन्यासाठी दररोज दोन तासांचा वेळ मला द्यावा. मी काँग्रेसच्या व शहरातील सुसंस्कृत तरुण आणि जबाबदार नागरिकांच्यावतीने तुमचा अभ्यास वर्ग घेण्यासाठी रोज यायला तयार आहे. तुमचा जसा “दहशत” या विषयाचा दांडगा अभ्यास आणि वारसाहक्काने चालत आलेला प्रदीर्घ अनुभव आहे, तसा माझा महापुरुष, त्यांचे कार्य, इतिहास, भूगोल, विज्ञान, कला अशा विविध गोष्टींचा सखोल व दांडगा अभ्यास आहे.

तथाकथित लोकार्पण सोहळा प्रसंगी भाषण करताना आपण म्हणालात की, महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन तुम्ही काम करता. मग त्याच महाराजांच्या पुतळ्यासमोर अश्लिल गाण्यांवर नाच करायची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली ? तुम्ही महाराजांच्या केलेल्या अवमानासाठी तुम्हाला शिवप्रेमी अजन्म माफ करणार नाहीत. तुम्ही जर तुमच्या आयुष्यात कधी महापुरुषांच्या चरित्रांचा अभ्यास केला असता तर तुम्हाला नक्कीच महाराजांच्या पुतळ्यासमोर एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आणि शिवप्रेमी म्हणून आपण कसे वागावे याची प्रेरणा मिळाली असती. पण ही गोष्ट म्हणजे *”आपके बस की बात नही”* असा टोला काळे यांनी आमदारांना लगावला आहे.

काळे यांनी म्हटले आहे की, आमदारांनी याप्रसंगी घोषणा केल्याप्रमाणे महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविणे, धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करणे, त्याचबरोबर महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळे शहरात उभे करणे ही कार्य जरूर करावीत. किंबहुना शहराचे लोकप्रतिनिधी या नात्याने त्यासाठी आम्ही तुमच्याकडे पाठपुरावा करतच राहू. मात्र नुसते पुतळे उभे करण्याऐवजी त्या जोडीने या महान कार्य करणाऱ्या महापुरुषांचे चरित्र समजून घेत चांगल्या विचारांचे आचरण करत नगर शहरातील तरुण पिढीला आणि त्यांच्या पालकांना तुमच्या वर्तनाची लाज वाटणार नाही असे आचरण करावे, असा सल्ला काळे यांनी ही भेट पाठवत असताना आमदारांना जाहीरपणे दिला आहे.

किरण काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून आमदारांना जाहीरपणे सांगीतले आहे की, काँग्रेसने आपल्याला पाठवलेली महापुरुषांची ही पुस्तके आपल्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणाऱ्या आपल्या टवाळखोरांना देखील वाचनासाठी आपण उपलब्ध करून द्यावीत. आपण जर ही पुस्तके उपलब्ध करून देखील वाचणार नसाल तर ती पुन्हा आम्हाला पाठवून देण्यात यावी. जेणेकरून ही पुस्तके शहरातील इतर तरुणांना वाचनासाठी आम्ही उपलब्ध करून देऊ शकू.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version