पुणे दिनांक 27 एप्रिल
निगडी प्राधिकरण परिसरात तुटलेली केबल गळ्याला अडकून दुचाकीवरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. संपदा पटवर्धन या पन्नास वर्षीय महिलेचे नाव होते. वीस दिवसांपूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्या धक्क्यातून कुटुंबीय सावरण्याआधीच पुन्हा त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पटवर्धन यांचा बळी गेल्याचा आरोप होत आहे.

घरातील काही साहित्य आणण्यासाठी संपदा पटवर्धन बाहेर गेल्या होत्या. परतत असताना सेक्टर २६ मधील प्रबोधन सोसायटीतून ज्ञानप्रबोधिनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोंबकळणारी केबल गळ्यात अडकल्याने त्या दुचाकीवरून खाली पडल्या. गाडीचा आवाज आल्याने जवळपास असलेल्या मुलांनी त्यांना निगडीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.दोन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र मंगळवारी त्यांचे निधन झाले.
अशाच प्रकारे नगर शहरातही एका तरुणाचा जीव रस्त्यावर लोंबकळणाऱ्या केबल वायर मुळे गेलेला आहे. या नंतर महापालिकेने अनेक वेळा खाजगी केबल कंपन्यांना नोटीस देऊन रस्त्यावर लोंबकळणाऱ्या केबल काढण्याबद्दल सूचना दिल्या होत्या महापालिकेने काही ठिकाणी कारवाई केली मात्र अद्यापही अनेक ठिकाणी अशा केबल लोंबकळतच आहे अजून एखादा मोठा अपघात घडण्याची वाट केबल कंपनी अथवा महानगरपालिका पाहत आहे का असा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे.




