अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील अॅड.राजाराम आढाव व त्यांची पत्नी अॅड. सौ. मनिषा आढाव या वकील दाम्पत्याची निर्घृण हत्या प्रकरणाचा निषेध जिल्हा न्यायालयातील कामकाज बंद करून अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आला. या खुनाचा तपास सीआयडी कडे देण्यात यावा. तसेच वकिलांवर होणारे हल्ले, खोट्या केसेस याबाबत वकील प्रोटेक्शन ॲक्ट करावा अशी मागणीही अहमदनगर बारअसोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नरेश गुगळे यांनी केली आहे.
अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने आज वकिलांनी काम बंद आंदोलन ठेवून या घटनेचा निषेध केला आहे. भविष्यामध्ये अशा घटना थांबल्या नाहीत तर वकील संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलने केली जातील असा इशाराही यावेळी वकील संघटनांनी दिला आहे. यावेळी भूषण बऱ्हाटे ,सतीश गुगळे, विनायक दारूनकर, संदीप पाखरे, विकास सांगळे, संदीप मुळे, विक्रम वाडेकर, शिवाजी अण्णा कराळे, विक्रम शिंदे आदी वकिलांनी सहभाग नोंदवला होता तसेच अहमदनगर मधील जिल्हा न्यायालयातील बंद मध्ये अहमदनगर बार असोसिएशन, सेंट्रल बार असोसिएशनचे तसेच कौटुंबिक न्यायालय, महसुल न्यायालय, औद्योगिक व कामगार न्यायालय, लवाद न्यायालय, ग्राहक मंच, या सर्व न्यायालयांमधील वकिलांनी सहभाग घेतला होता.