अहमदनगर दि.१२ऑक्टोबर
अहमदनगर महानगरपालिकेच्या कर वसुली विभागाच्या अनेक ना ना तऱ्हा समोर आल्यानंतर आता महानगरपालिका आयुक्तांनी युद्ध पातळीवर कर वसुली विभागाची बैठक घेऊन कर्मचाऱ्यांना कर वसुली बाबत मार्गदर्शन केले आहे. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याने आपापल्या विभागातील नोंद न झालेल्या व्यावसायिक आणि रहिवासी इमारतींची मोजणी करून त्याची नोंद करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून जो कर्मचारी हलगर्जीपणा करेल त्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी कर वसुली बाबत आता कडक भूमिका घेतली असून त्या खालोखाल महानगरपालिकेचे उपायुक्त कर सचिन बांगर यांनी सुद्धा कर्मचाऱ्यांना सूचना देऊन कर वसुली बाबत बैठका घेतल्या आहेत. आधी केलं आणि नंतर सांगितलं या म्हणीनुसार महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे आणि उपायुक्त कर सचिन बांगर यांनी एका महिन्यात अहमदनगर शहरातील नालेगाव परिसरातील वारुळाचा मारुती या भागात जवळपास साडेतीन हजार रहिवासी आणि व्यावसायिक इमारतींची नोंद आपल्या कर्मचाऱ्याद्वारे महानगरपालिकेच्या दप्तरी करून घेतली आहे. एका महिन्यात जवळपास साडेतीन हजार घरांची नोंद झाल्यामुळे यातून महानगरपालिकेला वार्षिक जवळपास पाच कोटी रुपयांचे उत्पादन मिळू शकते. मात्र या आधीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नसल्याने कर्मचारीही याकडे दुर्लक्ष करून काही ठराविक कर्मचाऱ्यांच्या खिशातच महानगरपालिकेचा कर जात होता त्यामुळे महानगरपालिकेच्या उत्पादनात वर्षानो वर्ष थकबाकी वाढत होती.मात्र आता महानगरपालिकेचे आयुक्त उपायुक्त यांनी कर वसुली बाबत चांगलीच कडक भूमिका घेतल्याने आता कर्मचारीही कामाला लागले आहेत त्यामुळे यावर्षीच्या कर उत्पादनात नक्कीच वाढ होईल अशी अपेक्षा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे.