अहमदनगर दि.२६ जुलै –
महानगरपालिकेच्या ४ नंबर शाळेतून टीव्ही चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. निलेश छगनराव साळवे (वय ३२, रा.भिमवाडा, रेल्वेस्टेशन, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून केडगाव बायपास येथून कोतवाली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक चार मधील कर्मचारी विजय शंकर घिगे (वय ३५, रा.साईपार्क , समतानगर, नगर-कल्याण रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाळेतील आय -९ कंपनीचा टीव्ही चोरीला गेल्याचा गुन्हा दि.२४ जुलै रोजी दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना निलेश छगनराव साळवे याने शाळेतील टीव्ही चोरल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. आरोपी साळवे हा केडगाव बायपास येथे येणार असल्याची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. तसेच महानगरपालिकेच्या शाळेतून चोरी गेलेला टीव्ही जप्त करण्यात आला आहे. आरोपी साळवे वर यापूर्वीचे घरफोडी चा एक जबरी चोरी चा एक आणि अवैध दारू विक्रीचे दोन असे चार गुन्हे दाखल आहेत.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोना शाहिद शेख, रवींद्र टकले, संदीप साठे, प्रमोद लहारे, सुमित गवळी, दीपक रोहकले, सायबर सेलचे पो.कॉ नितीन शिंदे यांनी ही कारवाई केली आहे.