अहमदनगर दि.१५ नोव्हेंबर
अहमदनगर शहरातील कोविड 19 या संसर्ग तीव्र स्वरूपाचा असताना त्या दरम्यान कोविड निर्मूलनासाठी उभा राहिलेली कोविड सेंटर वादात सापडण्याची चिन्हे असून या कोविड सेंटर बाबत अहमदनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी अर्ज देऊन तक्रार केली होती त्यानुसार आता अहमदनगर शहरातील कोविड सेंटर बाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
कोविड निर्मूलनासाठी आरोग्य विभागाने तीन प्रकारचे सेंटर उभारण्याची वर्गवारी केली होती त्यामध्ये रुग्णांना लक्षणांनुसार वर्गीकरण करुन कोविड केअर सेंटर,डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर,डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल अशी रचना करण्यात आली होती त्यामध्ये कोविड केअर सेंटर या ठिकाणी केवळ कोविड १९ ची चाचणी सकारात्मक आली आहे. परंतू कोणताही त्रास होत नाही अशा लोकांना देखरेखीसाठी ठेवण्याची जागा होती ,डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर या ठिकाणी चाचणी सकारात्मक आली आणि सौम्य लक्षण आहेत अशा रुग्णांना उपचार देण्यासाठी रुग्ण दाखल करण्यात येऊ शकत होते, आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल यामध्ये सकारात्मक चाचणीत तसेच तीव्र लक्षण असणारे रुग्णांना उपचार देण्यासाठी ताप उपचार, कोविड संशयीत रुग्ण व कोविड नियंत्रणासाठी परवानगी देण्यात आली होती.
अहमदनगर महानगरपालिका हद्दीत महानगरपालिका आयुक्त यांना साथ रोग नियंत्रणाचा सक्षम अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते त्यामुळे मनपाच्या हद्दीत कोविड-१९ चे च्या अनुषंगाने कोविड केअर सेंटर व कोविड हॉस्पीटल तयार करण्याची,मंजुरी देण्याचे अधिकार केवळ मनपा आयुक्त यांना दिले होते असे असतांनाही महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांना कोणताही अधिकार नसतांनाही केवळ हॉस्पीटल धारकांशी हातमिळवणी करुन बोगस कोविड केअर सेंटरला परवानग्या दिल्या आहेत. यामध्ये तीव्र लक्षण असणारे रुग्णांन बेकायदेशीरपणे दाखल करुन घेवून त्यांच्या मृत्युस सदरची हॉस्पीटल जबाबदार ठरलेल् आहेत. त्यामुळे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आणि शहरातील कोविड सेंटर चालवणाऱ्या हॉस्पिटल यांच्याविरुद्ध भादवि कलम ४२०, ३०४अ, १२०ब नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संदीप भांबरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
याबाबत कोतवाली पोलिसांनी चौकशी सुरू केली असून महानगरपालिकेकडे तपासी अधिकाऱ्यांनी पत्र पाठवून अहमदनगर शहरातील सर्व कोविड सेंटर हॉस्पिटलची माहिती मागवली आहे.