अहमदनगर दि.११ मार्च
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी लोकसभा मतदारसंघाची पहिली प्रचार फेरी पूर्ण केली आहे. खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रत्येक तालुक्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिकांना विविध कार्यक्रमाची मेजवानी दिल्याने त्यातूनच त्यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली असून जवळपास नगर दक्षिण मधील सर्वच तालुक्यात सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन सुजय विखे पाटील यांनी आपल्या प्रचाराची फेरी पूर्ण केली आहे असेच म्हणता येईल.
खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रचाराचा झंजावात सुरू केला असून अजूनही आचारसंहिता लागली नसल्यामुळे मोठमोठ्या नेत्यांच्या सभा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. मात्र खासदार सुजय विखे पाटील यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांंबरोबरच विविध विकास कामांचा शुभारंभाचा धडाका लावला आहे त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन एक प्रकारे खासदार सुजय विखे पाटील आपला प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण करत असतानाचा चित्र सध्यातरी दिसून येत आहे. उद्या उलट महाविकास आघाडी तर्फे कोण उभा राहणार याचे चर्चेचे गुऱ्हाळ अद्यापही संपलेले नाही. महाविकास आघाडी सध्या तरी आमदार निलेश लंके यांच्याकडे डोळे लावून बसली आहे मात्र निलेश लंके यांनी अध्यापही आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीकडे सध्या तरी कोणताच उमेदवार डोळ्यासमोर दिसत नाही.आमदार निलेश लंके यांची भूमिका जर महाविकास आघाडीसाठी सकारात्मक राहिली तरच महाविकास आघाडीमध्ये नवचैतन्य येऊ शकते मात्र सध्या तरी महाविकास आघाडीकडे उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.
महाविकास आघाडी मधील शरद पवार गट,काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये अद्यापही लोकसभेसाठी बैठक झाल्याची माहिती नाही अथवा उमेदवारी कोणाला द्यायची यावरही चर्चा झाली याबाबतही माहिती नसल्यामुळे महाविकास आघाडीकडे उमेदवार कोण याबाबत उत्तर नाही असेच दिसून येतेय.
याउलट खासदार सुजय विखे पाटील यांना पक्षांतर्गत जो विरोध सुरुवातीला होत होता तो विरोध आता मावळू लागला असून भाजपचे अनेक पदाधिकारी आता सुजय विखे पाटील यांच्याबरोबर सक्रिय दिसू लागले आहेत त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराचा झांजावात आता आणखीन वाढण्याची शक्यता आहे.