मुंबई दि १४ जुलै
आमदारांसोबत अनेक नगरसेवकही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदारांचा मोठा गट शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. खासदारांचा दोन तृतीयांश गट शिंदे गटात सहभागी होऊ शकतो. सध्या याबाबत हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची बैठक पार पडली. यात शिवसेनेचे १५ खासदार उपस्थित होते. ४० आमदारांनंतर शिवसेनेच्या १८ पैकी १५ खासदार वर्षा बंगल्यावर ही बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. झी २४ तास या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
राष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या द्रोपदी मुर्म यांना पाठिंबा द्यावा अशी भूमिका आधीच काही खासदारांनी घेतली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत खा. संजय राऊत यांचा विरोध डावलून बहुतांश खासदारांनी भाजपला पाठिंबा द्यावा अशी आग्रही मागणी धरली होती आणि उद्धव ठाकरेंनी तसा निर्णय घेतला आहे मात्र अनेक खासदारांना अद्यापही काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर राहण्याची इच्छा नसल्याने आणि भाजपबरोबर जाऊन केंद्रात एखादे मंत्री पद मिळाले तर त्याचा फायदा महाराष्ट्रासाठी होऊ शकतो अशी भावना असल्याने अनेक खासदार शिंदे यांच्या मताशी सहमत आहेत.