अहमदनगर दिनांक 24 ऑगस्ट
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी आयोजक मंडळे व गोविंदा पथक सज्ज झाले आहेत़ सेलिब्रिटींची उपस्थिती आणि गाण्यांच्या तालावर शहरातील विविध चौकांमध्ये मंगळवारी दहीहंडीचा उत्सव रंगणार आहे़ आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्य युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित दहीहंडी उत्सवासाठी द केरला स्टोरी मधील फेम सिनेअभिनेत्री अदाह शर्मा येणार असल्याने दहीहंडीचा आनंद द्विगुणित होणार आहे़.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवाचे सर्वांनाच मोठे आकर्षण असते़ हा उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला असून, आयोजक मंडळे व गोविंदा पथकांनी जय्यत तयारी केली़ चौकाचौकात फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत़.
त्याचबरोबर युगंधर वाद्य पथकाचा ढोल ताशाचा आनंदही यावेळी घेता येणार आहे त्याचबरोबर पुणे येथील प्रसिद्ध अशा एस आर एस एस एम डीजे यावेळी ऐकायला मिळणार आहे.
गंगा उद्यान समोरील चौकात मंगळवारी सायंकाळी सात वाजता दहीहंडी उत्सवाला प्रारंभ होणार आहे़ अदाह शर्मा हिच्या उपस्थितीत येथे १ लाख ११ हजार १११ रुपयांची ही दहीहंडी होणार आहे़ दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई येथील महाराजा गोविंदा पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
शहरातील दिल्लीगेट, चौपाटी कारंजा, रंगार गल्ली, बुरुड गल्ली, नेता सुभाष चौक, गांधी मैदान, लक्ष्मी कारंजा, प्रोफेसर कॉलनी, सावेडी उपनगर, भिंगार, पाईपलाईन रोड, चितळे रोड आदी भागात विविध मंडळांच्यावतीने दहीहंडी उत्सव रंगणार आहे़ शहरातील प्रमुख मंडळांच्या दहीहंडी फोडण्यासाठी जिल्ह्यासह पुणे, मुंबई, कल्याण, भिवंडी येथील गोविंदा पथके सहभागी होणार आहेत. विविध मंडळांच्या वतीने किमान ४५ ते ४० ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवाला कुठलेही गालबोट लागू नये म्हणून दहीहंडीच्या ठिकाणासह शहरातील विविध चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे़.