अहमदनगर दि.१५ ऑक्टोबर
भिंगारमधील बनावट एनओसी प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या रोहन किशोर धेंडवाल (रा. वैद्य, कॉलनी, नगर-जामखेड रोड) याच्या तीन बँक खात्यांत ११ महिन्यांच्या कालावधीत ६३ लाख रूपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. धेंडवालची दोन बँक खाती तपासली असून, आणखी एका बँक खात्याची तपासणी सुरू आहे.
बनावट एनओसी प्रकरणात पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या पथकाने मंगळवारी विनय दत्तात्रय वराडे (वय ६३, रा. भिंगार) या तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे आरोपींची संख्या तीन झाली आहे. हा आरोपी लष्करातीलच एनओसी विभागातील सेवानिवृत्त असल्याने आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.
धेंडवालच्या दोन बँक खात्यात ११ महिन्यांत ६३ लाखांची देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या एचडीएफस बँकेच्या खात्यात ५८ लाख रूपये तर नाशिक मर्चंट्स या बँकेच्या खात्यात ५ लाखांची देवाणघेवाण झाली आहे.
मंगळवारी अटक केलेल्या विनय वराडे याला १५ ऑक्टोबरपर्यंत तर रोहन धेंडवालच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गजेंद्र इंगळे समाधान सोळंके अभय कदम,सलीम शेख,सुमीत गवळी, बंडू भागवत, रवींद्र टकले, अतुल काजळे, दीपक बोरूडे, यांचे पथक करत आहे.