अहमदनगर दि २९ सप्टेंबर
नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर अहमदनगर मधील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम घेतल्याबद्दल आयोजक गणपती मंडळाच्या अध्यक्षांसह गौतमी पाटील आणि तिच्या मॅनेजर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर शहरातील पाईपलाईन रोडवर २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळ यांच्यावतीने गौतमी पाटील नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास प्रशासनाने परवानगी नाकारली होती. मात्र तरीही हा कार्यक्रम झाल्यामुळे पोलिसांनी आता गौतमी पाटील, तिचा स्वीय सहाय्यक अशोक खरात आणि कार्यक्रमाचे आयोजक असलेले मृत्युंजय प्रतिष्ठान आणि एकदंत मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल सांगळे,आनंद कैलास नाकाडे,हर्षल किशोर भागवत, यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये रस्त्यात अडथळा निर्माण होईल असा कार्यक्रम घेणे तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी क्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून डी जे सिस्टीम लावून कर्णकर्कश आवाजामध्ये गाणी लावून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करणे, वारंवार आवाज कमी करण्याच्या सूचना देऊनही सूचनांकडे दुर्लक्ष करणे या कारणांसाठी भादवी कलम १८८,२८३,३४१, ३४ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम१९८६ चे कलम २, १५ व ध्वनी प्रदुषण अधिनियम २००० चे कलम ३,४,५,६,मु.पो.का.क ३७ (१) (३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.