अहमदनगर दि.२५ जुलै
घरी किंवा शाळेच्या परिसरात कोणी त्रास दिल्यास संबंधित व्यक्तीची तक्रार निर्भयपणे पोलिसांना द्या, तक्रार आल्यास छेड काढणाऱ्यावर तातडीने कारवाई केली जाईल, असे आश्वासन कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिले. तसेच, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यास बदनामी होईल, या भीतीमुळे काही मुली तक्रार करत नाहीत. त्यामुळे असे न करता त्रास देणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्या, तुमचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलीस निरीक्षक यादव यांनी सांगितले.
केडगावातील अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयात विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करीत असताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव बोलत होते. मुलींची छेडछाड, पाठलाग करणे, मोबाईल वरून त्रास देणे असे प्रकार होऊ नये, यासाठी कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव शहरातील शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करत आहेत. आतापर्यंत शहरातील पाच शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. शाळेत येता-जातांना, क्लासेसच्या ठिकाणी, प्रवास करताना कुणीही छेड काढल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार द्यावी, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, मुलींना तक्रार करण्यासाठी शाळेत तक्रार पेटी लावली जावी, मुलींना त्रास होत असल्यास त्यांना शिक्षकांकडे तक्रार द्यावी , अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य पोपट घोडके, गुरुकुल प्रमुख कैलास आठोरे, राजेंद्र जाधव, सिताराम जपकर,भरत कासार, जयश्री बामदळे, रोहिणी दरंदले, लक्ष्मण रोडे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश खामकर व संतोष जरे ,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश ढगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अरुणा दरेकर यांनी मानले.
कोणी त्रास दिल्यास अशी करा तक्रार
मोबाईल वरून विनाकारण मेसेज करणे, पाठलाग करणे, प्रवासात स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे, वाईट उद्देशाने टक लावून पाहणे अशा प्रकारे छेड काढणाऱ्याची तक्रार पोलिसांना द्यावी. पोलिस स्टेशनच्या ०२४१ २४१६११७ किंवा ११२ या मदत क्रमांकावर संपर्क करून माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच ७७७७९२४६०३ या पोलीस निरीक्षक यादव यांच्या क्रमांकावर मेसेज करून सुद्धा तक्रार करू शकता.