अहमदनगर दि .२५ जुलै
जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यातील तीन सराईत आरोपींना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. सुमित संदीप नालकोल (वय २४, विनायकनगर, बुरुडगाव रोड अहमदनगर) या तरुणाचे तक्रारीवरून दि.२४ जुलै रोजी भाजी मार्केट समोरील अक्षय हॉटेलजवळ चार जणांनी गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांच्या पथकाने आरोपींना तात्काळ अटक केली आहे.
समीर ख्वाजा शेख (वय २०, रा. झारेकर गल्ली, अहमदनगर), नवाज रौफ सय्यद (वय २०, रा. बुरुडगाव रोड), कृष्णा गुंड (दौंड रोड, अरणगाव अहमदनगर), परवेझ मोहम्मद शेख (रा.भोसले आखाडा) या चार आरोपींवर भादवि कलम ३०७, ३२३, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सुमित संदीप नालकोल हे त्यांच्या मोटरसायकलवरून जात असताना आरोपी समीर ख्वाजा शेख याने शिवीगाळ करण्यास सुरुवात आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर परवेश शेख याने फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीन आरोपींना अटक केली आहे. समीर ख्वाजा शेख याच्यावर चोरी, घरफोडी आणि तडीपारीचे आदेश न पाळणे असे एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. आरोपी नवाज रौफ सय्यद वय याच्यावर जबरी चोरी, मारहाण असे ४ गुन्हे दाखल आहेत. आरोपी परवेझ मोहम्मद शेख याच्यावर चोरी, हत्यार बाळगणे असे ५ गुन्हे दाखल आहेत.
यापुढेही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमांवर कठोर कारवाई करणार असल्याचे यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे पोलीस जवान योगेश भिंगारदिवे अमोल गाडे गणेश धोत्रे अभय कदम रिंकू काजळे अमोल गाडे सुरेश थोरात सचिन मिसाळ सोमनाथ राऊत सलीम शेख बिल्ला इनामदार यांनी केली.