अहमदनगर दि.२७ नोव्हेंबर -( सुशील थोरात)
नाव मुकुंदनगर मात्र बहुसंख्य मुस्लिम धर्मिय नागरिकांची वसाहत असलेला भाग या भागात 45 ते 55 हजार लोकसंख्या असलेल्या काही भागात अजूनही नागरी समस्या मुळे नागरिकांचे जीवन जगणे कठीण झाले आहे.
महानगर पालिकेच्या मुख्यकार्यालया समोर मुकुंदनगर वसाहत आहे मात्र अनेक समस्यांचा विळखा अजूनही कायम आहे. मुकुंदनगरमधील काही भागात मध्यरात्री एक ते अडीचच्या दरम्यान पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे पाणी भरण्यासाठी महिलांना जागरण करावे लागते या अशा अवेळी येणाऱ्या पाण्यामुळे महिलांना अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे अहमदनगर शहरातील कोणत्याच भागात अशी अवेळी पाणी सुटण्याची वेळ नाही मात्र मुकुंद नगर मधील काही भागात असे अवेळी पाणी का सोडले जाते हाही प्रश्न आता सातत्याने समोर येतोय. मुकुंद नगर वर हा अन्याय का? असा प्रश्न या परिसरातील नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
मुकुंद नगर भागातील तरुण नगरसेवक असिफ सुलतान यांनी इतर नगरसेवकांनी या पाणी प्रश्नासाठी नगरसेवक झाल्यापासून अनेक वेळा महानगरपालिकेत आंदोलन केले आहेत. तत्कालीन आयुक्त शंकर गोरे यांच्या दालनात झोपा काढो आंदोलन करूनही मुकुंद नगरच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही! का मुद्दामहून सोडवला जात नाही. कारण इतर भागात पाण्याच्या प्रश्नावर आंदोलन झाले की तेथील प्रश्न तातडीने सोडले जातात. मात्र अनेक आंदोलन मोर्चे निवेदने देऊनही मुकुंद नगर मधील त्या भागातील पाणी सोडण्याची वेळ अद्यापही बदलली गेली नाही हे विशेष.
पाण्याच्या प्रश्ना बरोबरब मुकुंदनगर परिसरातील विविध रस्त्यांची अवस्था बिकट आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे चारचाकी वाहने या रस्त्यावरून प्रवास करणे टाळतात. विशेष म्हणजे रस्त्यावर असणारे ड्रेनेज चेंबरचे झाकण हे रस्त्याच्यावर आले आहे. त्यामुळेदेखील अपघाताची परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी मनपाचे कर्मचारी फिरकत नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना नाइलाजाने स्वतःच्या खर्चाने रस्त्यावर मुरुम टाकून खड्डे बुजवावे लागतात याशिवाय या भागातील कचरा, अस्वच्छता यांच्याही समस्या कायम आहेत.
दोन दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मुकुंद नगर मधील नगरसेवक आसिफ सुलतान यांनी सुरुवातीलाच सभागृहाला सांगितले की मागील सभेमध्ये सुद्धा नगरच्या प्रश्नावर आम्हाला चर्चा करू दिली नाही. आमचा आवाज सातत्याने दडपला जातोय. हे त्यांनी महानगरपालिकेच्या सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे खरंच मुकुंद नगरचा आवाज दाबला जातोय का? कोणी आवाज जाणीवपूर्वक दाबतोय का? कारण मुकुंद नगर मध्ये नागरिकच राहतात मग त्यांच्या समस्या सोडवणे हे महानगर पालिका प्रशासनाचे कर्तव्य असताना या ठिकाणच्या समस्या तातडीने का सोडवल्या जात नाही. नेहमीच मुकुंद नगरवर अन्याय का होतो. अशा भावना नागरिकांमध्ये आहेत.
जर मुकुंद नगर परिसरातील नागरिकांनी ठरवले तर ते नगरच्या राजकारणात मोठा बदल हे घडवून आणू शकतात एवढी ताकद या मुकुंद नगर मध्ये असूनही फक्त राजकारणा मुळे मुकुंद नगर मधील नागरिकांना स्वतःची ताकद समजत नाही हेही तेवढेच खरे आहे. स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक मुकुंदनगर वासियांनी एकीचे बळ दाखवले तर मुकुंद नगर सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही.
तसंच यावेळी सभागृहात बोलताना नगरसेवक असे सुलतान यांनी मोठा गोप्यस्फोट केला की पाणी प्रश्नाबाबत काही प्रशासकीय अधिकारी मुकुंद नगर परिसरला भंगार लोकांचा परिसर म्हणून संबोधतात हा अत्यंत संतापजनक प्रकार असून याबाबत प्रशासनाने आशा बोलणाऱ्यावर निश्चित कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
नगर शहरातील प्रत्येक नागरिक हा महानगरपालिका प्रशासनाकडून सेवा घेण्यासाठी हक्कदार असताना महापालिका प्रशासन ठराविक नगरसेवकांच्या प्रभागात सर्वच सेवा देतात तर काही ठिकाणी झाडूवाला सुद्धा येत नाही अशी परिस्थिती या शहरात आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने राजकीय दबाव झुगारून काम करणे गरजेचे आहे.