अहमदनगर दि.२८ नोव्हेंबर
अहमदनगर शहरातील शंभर वर्षांपेक्षा अधिक स्थापन झालेली नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचा परवाना रिझर्व बँकेने रद्द केला आहे त्यामुळे सर्वात जुनी असलेली बँक काही संचालकांमुळे बंद पडली आहे. अनेक ठेवीदारांचे पैसे पैसे अडकून पडले असून अनेक बेकायदेशीर कर्ज प्रकरणे करून अनेक लोक अजूनही मोकळे फिरत आहेत.
कर्ज वाटपातील अनियमितता, आर्थिक व्यवहारातील गैरप्रकार, सुमारे आठशे कोटींचे थकीत कर्ज यामुळे बँक बंद पडली आहे साडेतीनशे कोटींच्या ठेवी आणि करोडो रुपयांचे भाग भांडवल बँकेत अडकून पडले आहेत.
याबाबत बँक बचाव समिती वेळोवेळी सभासदांना सर्व गोष्टी उघडपणे सांगत असतानाही या गोष्टीकडे अनेक कर्जदार आणि सभासद यांनी दुर्लक्ष केल्यामुळे अखेर ही बँक बंद पडली आहे. राजकीय हस्तक्षेप आणि राजकीय नेते संचालक म्हणून बँकेच्या व्यवस्थापनात ढवळाढवळ केल्यामुळे बँक बंद झालीय.
आता ठेवीदारांचे डोळे उघडले असून काही दिवसांपूर्वी ठेवीदारांनी आणि बँक बचाव समितीने पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून दोषी असलेल्या कर्जदार आणि संचालक यांच्यावर कारवाई करावी यासाठी सर्वांनी मागणी केली होती.दोषी लोकांवर कडक कारवाई व्हावी यासाठी काही कलम वाढवण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. त्यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी याबाबत लवकरच बँकेतील घोटाळ्यासंदर्भात यापूर्वीच दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स ऍक्ट (mpid) कायदा कलम वाढवण्याचे आश्वासन दिले होते .
आर्थिक गुन्हे शाखेकडून सध्या या गुन्ह्याचा तपास सुरू असून अपर पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या सूचना प्रमाणे बँकेच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी सर्व कायदेशीर बाबी तपासून आता ठेवीदार संरक्षण कायद्याचे कलम वाढवण्यात आले आहे.एमपीआयडी कायद्यानुसार कमाल शिक्षा सहा वर्षांची आहे.या प्रकरणामध्ये नगर अर्बन बँकेचे तत्कालीन चेअरमन, नगर अर्बन बँकेचे तत्कालीन संचालक मंडळातील सदस्य, नगर अर्बन बँकेचे तत्कालीन अधिकारी, आशुतोष लांडगे सचिन गायकवाड,रेणुकामाता मल्टीस्टेटसोसायटी,अच्युत घनशाम बल्लाळ यांच्या विरोधात राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता तेव्हापासून या प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू आहे. कालांतराने हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आता फॉरेन्सिक ऑडिटचा अहवालही आर्थिक गुन्हे शाखेला प्राप्त झाला असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि खरे गुन्हेगार यांना कडक शासन व्हावे आणि ठेवीदारांच्या ठेवी लवकरात लवकर मिळाव्यात अशीच अपेक्षा नगर अर्बन बँक बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची आणि ठेवीदार यांची आहे.