अहिल्यानगर दिनांक 7 जानेवारी :
बनावट शस्त्र परवाने तयार करून अवैधरित्या बाराबोअर रायफल व काडतुसे जवळ बाळगून अहिल्यानगर जिल्ह्यासह पुणे व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध बँकांमध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी करणार्या नऊ जणांच्या टोळीला पकडण्यात आले होते . त्यांच्याकडून १२ बोअर, ९ रायफल आणि ५८ काडतूस जप्त करण्यात आले होती ही कारवाई तोफखाना पोलीस व पुणे येथील दक्षिणी कमांड मिलीटरी इंटेलिजन्सच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली होती त्यामध्ये नऊ जणांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जम्मू काश्मीरमधील रहिवाशी असलेले काहीजण बनावट शस्त्र परवाने तयार करून त्याआधारे गावठी बनावटीच्या बाराबोअर रायफल खरेदी करून नगरसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी खासगी सुरक्षा एजन्सीमार्फत बँकांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत. ते शासनाची फसवणूक तर करत आहेतच शिवाय त्यांच्या पासून सार्वजनिक सुरक्षेलाही धोका आहे, अशी माहिती तोफखाना पोालिसांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना माहिती दिली व पुढील कारवाईसाठी दक्षिणी कमांड मिलीटरी इंटेलिजन्स, पुणे यांची मदत घेतली. दोघांच्या संयुक्त पथकाने संशयितांची नावे व ते कुठे काम करतात याची माहिती काढली. त्यानंतर एकाच वेळी अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील सोनई श्रीगोंदा तसेच छत्रपती संभाजीनगर, पुणे येथेे ठिकठिकाणी छापेमारी करत नऊ जणांना ताब्यात घेतले होते.
यामध्ये शब्बीर मोहंमद इक्बाल हुसैन गुज्जर, महंमद सलीम उर्फ सार्लेम गुल महंमद, महंमद सफराज नजीर हुसैन, जहांगिर झाकिर हुसैन, शाहबाज अहमद नजीर हुसैन, सुरजित रमेशचंद्र सिंग, अब्दुल रशिद चिडीया, तुफेल अहमद महंमद गाजीया, शेर अहमद गुलाम हुसैन यांचा समावेश होता. हे सर्व मुळचे जम्मू काश्मीर मधील राजौरी जिल्ह्यातील रहिवासी आहेत व सध्या महाराष्ट्रात राहून नोकरी करत आहेत.
या सर्वांकडे राजौरी जिल्हाधिकार्यांच्या सह्यांचे शस्त्र परवाने आढळून आले होते. त्याची खातरजमा केल्यावर ते बनावट असल्याचे समोर आले होते.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तोफखाना पोलिसांनी सर्वांना अटक केली होती सात दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. याप्रकरणी सर्व आरोपींनी जामीन मिळावा यासाठी अॅड. महेश तवले, अॅड. संजय दुशिंग, अॅड. विक्रम शिंदे यांच्या मार्फत अहमदनगर जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर जिल्हा न्यायाधीश सी.एम.बागल यांच्यासमोर आरोपी आणि सरकारी वकील यांनी युक्तिवाद केला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना काही अटी आणि शर्तीवर जामीन मंजूर केला आहे.