अहमदनगर दि.२९ एप्रिल
: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी योजनेची बिले नवीन सरकार स्थापन झाल्यापासून आजतागायत थकीत होती. ही बिले तात्काळ देण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उप जिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी केली होती. यासंदर्भात त्यांनी पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी महाराष्ट्र दिनी अडवून त्यांना या दिवशी नगर शहरात फिरू दिले जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला होता. याची दखल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. आणि त्यांनी जिल्हाधिकारी शालीमठ यांना दिले. त्यांनी लगेचच जिल्हा पुरवठा अधिकारी याना बोलावून शिवभोजन थाळी केंद्र चालकांची थकीत बिले तात्काळ निगर्मित करण्याचे आदेश दिले.
याबाबतची तत्परता लगेचच दाखवून गोरगरीब जनतेला पोटभर जेवण देण्याची योजना बंद न पडू दिल्याबद्दल आणि आपल्या इशाऱ्याची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही केल्याबद्दल शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे जाहीर आभार मानले आहेत. तसेच हा प्रश्न त्वरित सुटल्याने हे आंदोलन आपण मागे घेत असल्याचे सांगितले आहे .
महाविकास आघाडीची सत्ता जाऊन शिंदे शिवसेना आणि भाजपाची सत्ता आल्यापासून शिवभोजन थाळी योजनेच्या केंद्रांचे अनुदान थकविण्यात आले होते. त्यामुळे ही केंद्रे बंद पडण्याच्या मार्गावर होती. केंद्र चालकांनी ही केंद्र चालविण्यास असमर्थता दर्शविली होती. यासंदर्भात राज्य शासनाच्या पुरवठा मंत्रालयाने हे अनुदान त्वरित निगर्मित न केल्यास नगर जिल्ह्यातील हजारो गोर गरीब उपाशी राहणार आहेत त्यामुळे हे अनुदान तात्काळ द्यावे अन्यथा महाराष्ट्र दिनी महसूल मंत्र्यांची गाडी रोखण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उप जिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दिला होता. त्याची दखल घेत ही थकीत बिले तात्काळ अदा झाल्यामुळे याबाबत जाधव यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. केंद्र चालकांनी देखील गिरीश जाधव आणि जिल्हा प्रशासन तसेच पालकमंत्र्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.