मुंबई दि.३ जुलै
शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती देण्यात आली आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानं राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. अखेर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विविध स्तरातून एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचं पाहायला मिळालं.
अशातच शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील सोशल मीडियावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शुभेच्छा दिल्या. यामध्ये त्यांनी ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असं म्हटलं आहे. तसेच या पोस्टमध्ये आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कुठेही फोटो टाकला नाही.