अहिल्यानगर
अहमदनगर शहर मतदारसंघातील निवडणूक ही चांगलीच गाजली अवघ्या दहा दिवसात महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेऊन निवडणुकीत रंगत आणली होती तर महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी गेल्या वर्षभरापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली होती त्यामुळे खऱ्या अर्थाने अत्यंत सूक्ष्म असे नियोजन करण्यात संग्राम जगताप यशस्वी ठरले आणि त्यांनी ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली तरीही या निवडणुकीचे वैशिष्ट्ये अनेक आहेत.
राज्यात महायुतीचे सरकार स्थपन झाल्यापासूनच संग्राम जगताप यांनी नगर शहरात कामाचे नियोजन केले होते राज्यात सरकार असल्यामुळे त्यांनी नगर शहर विकासासाठी भरघोस निधी मंजूर करून आणला होता मात्र लोकसभेच्या आचारसंहितेमुळे आणि त्यानंतर आलेल्या विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे ते काम रेंगाळले होते आणि विधानसभा निवडणुकीच्या आधीच सर्व काम सुरू झाले होते कामाचे काही टप्पे पूर्णही करण्यात संग्राम जगताप यशस्वी झाले होते.नगर शहरात आलेला मोठा निधी हा त्यांच्यासाठी जमेची बाजू होती. तर त्याच वेळी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होता. नगर शहर मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाणार याबाबत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत प्रश्नचिन्हच होते.नगर शहर मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता तरी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या वाटाघाटी मध्ये नगर शहर हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी नाराज झाले होते अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत ही नाराजी दूर करण्यात अभिषेक कळमकर यांचा वेळ खर्च झाला. एवढे करूनही शिवसेना जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांचा अर्ज शेवटच्या पंधरा सेकंदामुळे कायम राहिला होता.
प्रचार सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना शिवसेनेच्या सर्वच नगरसेवकांना बरोबर घेण्यासाठी मोठा वेळ गेला मात्र तरीही अनेक जण महाविकास आघाडीच्या स्टेजवर शेवटपर्यंत दिसलेच नाहीत तर काही पदाधिकांनी थेट महायुतीच्या प्रचार फेरीमध्ये सहभाग घेऊन आपली दिशा स्पष्ट केली होती. सुरुवातीला अभिषेक कळमकर यांचे पारडे काहीसे कमजोर वाटत असताना शेवटच्या काही दिवसात हे पारडे जड होताना दिसत होते. मात्र राज्यभरात निघालेले फतवे आणि नगर शहरात सोशल मीडियावर फिरत असलेल्या ठराविक ठिकाणी फक्त तुतारी चालणार या पोस्टमुळे शहरातील वातावरण बदलत गेले आणि याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसला त्याचप्रमाणे लोकसभेला भेटलेली जनतेचे सहानुभूती पुन्हा एकदा विधानसभेला भेटेल या फाजील आत्मविश्वासावर महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते राहिले आणि तोच आत्मविश्वास आत्मघाती ठरला.
नगर शहरात संग्राम जगताप यांनी स्वतः प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक गल्लीत, कॉलनीत जाऊन प्रचार केला त्याचप्रमाणे त्यांनी सूक्ष्म असे नियोजन केल्यामुळे प्रत्येक गोष्ट स्वतः हाताळली प्रचाराचे नियोजन बैठका सुरू ठेवल्या त्यांच्याबरोबर अखंडपणे कार्यकर्त्यांची मोठी फळी कार्यरत होती त्यामुळे संग्राम जगताप हे घरोघरी पोहोचण्यात यशस्वी झाले होते. त्या उलट अभिषेक कळमकर यांना घरोघरी पोहोचण्यात मोठी कसरत करावी लागत होती त्यांच्याबरोबर कार्यकर्तेही कमी असल्याने ते घरोघरी पोहोचू शकले नाही.
संग्राम जगताप यांनी नगर शहरात एकही नेत्याची सभा घेतली नाही त्याचबरोबर महायुतीमध्ये असलेले घटक पक्ष भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट शिवसेना यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर बैठका घेऊन त्यांनाही आपल्याबरोबर सहभागी करून घेतल्यामुळे संग्राम जगताप यांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली होती त्यामानाने अभिषेक कळमकर यांना उद्धव ठाकरे शिवसेने मधील सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जवळ करण्यात यश आले नाही. ठराविक कार्यकर्तेच अभिषेक कळमकर यांचा प्रचार करताना दिसून आले तर त्या उलट महायुतीचे सर्वच घटक पक्षातील नेते आणि कार्यकर्ते संग्राम जगताप यांच्या प्रचारात अग्रभागी दिसून आले होते.
संग्राम जगताप यांनी सुरुवातीपासूनच विरोधी उमेदवाराचे नाव न घेता आपण केलेल्या विकास कामांंबाबत ठीक ठिकाणी जाऊन प्रचार केला तर त्या उलट अभिषेक कळमकर यांच्याकडून नगर शहरात पुन्हा एकदा भयमुक्ती आणि ताबेमारी, गुंडागिरी याच्याविरुद्ध आवाज उठवू असा नारा दिला मात्र हा नारा प्रभावी ठरू शकला नाही. त्याचबरोबर महाविकास आघाडीला जो फाजील विश्वास नडला तो लोकसभा निवडणुकीत झालेल्या विजयाचा आणि अमुक समाज समाज आमच्या बाजूने ही चर्चा सर्वात आत्मघाती ठरली आणि त्यामुळे महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. महाविकास आघाडीचे वतीने खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके यांच्या सभा झाल्या मात्र या सभेचा काहीही परिणाम झाला नाही. ज्या ठिकाणी खा.सुप्रिया सुळे यांची सभा झाली त्या ठिकाणी मोठे मताधिक्य जगताप यांना भेटले. महाविकास आघाडीचे वतीने संग्राम जगताप यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले मात्र संग्राम जगताप यांनी एकही आरोप अथवा एकदाही विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे नावही घेतले नाही एक मोठी विशेष गोष्ट या निवडणुकीत घडली आहे.
सुरुवातीपासून केलेले नियोजन आणि त्याच पद्धतीने झालेला प्रचार मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्यकर्त्यांबरोबर पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद आणि त्याचबरोबर सर्वांना दिलेल्या सूचना आणि त्याचे पालन करण्यासाठी ठेवलेले लक्ष आणि विकास कामांचे नियोजन यामुळे संग्राम जगताप हे मोठ्या फरकाने निवडून आले तर फाजील आत्मविश्वास ठेवून लोकसभेच्या हवेवर महाविकास आघाडीचे नेते राहिल्यामुळे आणि कमी वेळ असल्यामुळे आणि काही अफवांमुळे प्रचार यंत्रणा फेल झल्यामुळे संवाद नसल्यामुळे महाविकास आघाडीला अनेक ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला त्यामध्ये नगर शहरामध्येही तोच प्रकार झाला आहे. एकाही नेत्याची सभा न घेता एकहाती विजय हा संग्राम जगताप यांनी मिळवला आहे तर चार खासदार येऊनही महाविकास आघाडीला येथे पराभव चुकायला लागला.नगरकरांनी विश्वास जुना म्हणत संग्राम जगताप यांना भरघोस मतांनी निवडून दिले तर नवा चेहरा नाकारला.. हेच म्हणता येईल….