Homeराज्यआपल्याकडे बोट दाखवणाऱ्यांना शाहिस्तेखानासारखी कायमची धडकी भरवणारी अद्दल घडवावी लागणार आहे....खासदार उदयनराजे...

आपल्याकडे बोट दाखवणाऱ्यांना शाहिस्तेखानासारखी कायमची धडकी भरवणारी अद्दल घडवावी लागणार आहे….खासदार उदयनराजे भोसले यांचे थेट छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र… पहा जसेच्या तसे

advertisement

रायगड दि.४ डिसेंबर

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्य विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. राज्यपालांची हकलपट्टी करा अशी मागणी सर्व स्तरातून होत असतानाही अजूनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतप्त झाले होते त्यांनी आता राज्यपाल हटाव मोहीम सुरू केली असून याच पार्श्वभूमीवर त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांना पत्र लिहून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

पहा पत्र जसेच्या तसे

मुजरा महाराज, 
आज खूप गरज वाटतेय आपल्याशी बोलायची आम्ही आपल्याशी अंश-वंश म्हणून नाही तर आपला एक सर्वसामान्य मावळा म्हणून एक शिवभक्त म्हणून बोलतोय. आपण स्वराज्याचा पाया रचला. त्याला पावणे चारशे वर्ष झाली. एवढ्या वर्षात आम्हाला कुणाला आपल्याकडे वेदना मांडण्याची अथवा व्यथा लिहिण्याची वेळ आली नाही. कारण आपण रयतेसाठी इतके मोठे स्वराज्य निर्माण केले ते स्वराज्य म्हणजेच आपला महाराष्ट्र. आपला हिंदुस्थान. आपण घालून दिलेल्या आदर्शावर चालवता जात होता किंवा तसा आभास तरी होता.

अलिकडच्या काळात हद्दच झाली. विचारांचा कडेलोट होण्याची परिस्थिती उद्भवतेय की काय अशी रास्त भीती निर्माण झाली. अठरा पगड आणि बारा बलुतेदार यांना घेऊन निर्माण केलेल्या स्वराज्याची आणखी शकले होणार की काय असा विचार येऊन मन विषण्य झाले. म्हणूनच फक्त मनमोकळं करायला लिहितोय. मनोमन समक्ष उपस्थित राहून हितगुज साधण्याचा प्रयत्न करतो. सगळीकडेच अंधार दिसल्यावर आमच्या सारख्यांनी जायचं कुठे? व्यथा मांडायची कुठे? सगळं दिशाहीन झालंय. एकही विश्वासार्ह ठिकाण राहिले नाही. म्हणून आपल्या चरणाशी नतमस्तक होण्यासाठी आलोय महाराज…

महाराज, आपण इथल्या किल्ल्यात, पर्वतात, नदीत, जंगलात, डोंगररांगात, मातीच्या प्रत्येक कणात आणि प्रत्येक माणसाच्या मनात आहात. आपल्याबद्दल लिहिल्या, बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक शब्दात आजही तेवढाच आदर असतो. अभिमान असतो. डोक्यात मोठा आणि छोटा मेदू. जागच्या जागी असलेली प्रत्येक व्यक्ती आपल्यासमोर नतमस्तक आहे. पण छोटा आणि मोठा मेदू सोडून काही मूठभर लोकांच्या डोक्यात एक खोटा मेंदू असतो. टाळू भरताना, सटकून डोक्यावर पडलेली दोन-चार मंडळी आपल्याबद्दल चुकीच्या बाबी प्रचलित करण्याचा प्रयत्न करतात. वाईट वाटतं. विचार स्वातंत्र्य, भाषा स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखालील ही विकृती आहे हे स्वातंत्र्य नाही तर स्वैराचार आहे. आपल्या विषयी मला वाटेल तसं आणि मनाला येईल तसं वागेन असं जर कोणी म्हणत असेल तर त्याची नांगी जिरवावीच लागेल. हा आपल्या सारख्या विश्वाचं दैवत असलेल्या छत्रपतींचा मुद्दा आहे यात तडजोड नाही. 

आपल्यावर आमचा जेवढा हक्क आहे तेवढाच हक्क प्रत्येक मावळ्याचा आहे. मायमाऊलींचा हक्क आहे. वडिलधाऱ्यांचा आणि सर्वांचाच हक्क आहे म्हणून आपल्याबद्दल चुकीचे उद्धार काढण्यााची हिंमत दाखवणाऱ्या विकृत लोकांना आम्ही थेट उत्तर दिले पण आम्हाला ही प्रवृत्ती मोठी करायची नाही. मुठभर लोकांच्या मनातील ही विकृती कायमची ठेचायची आहे. ही एकट्या दुकट्याची किंवा श्रेय घेण्याची लढाई नाही. ही फक्त मराठी माणसाची लढाई नाही तर देशाच्या अस्मितेचा लढा आहे म्हणूनच थेट आपल्याशी संवाद साधतोय. 

महाराज, एक गोष्ट आज पुन्हा प्रकर्षाने जाणवली. तुमचे मावळे नावालाच एक आहेत. आमचे गटतट वाढलेत. प्रत्येकाला त्याचा गट, त्याची विचारधारा याचा फायदा बघायचा आहे. हरकत नाही. पण एकत्र यायला एक कारण किंवा एक विषय आजही आम्हाला पुरेसा आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 

आता कुठल्या गटाचा असो किंवा कुठल्या जाती-पातीचा असो. जो कोणी आपला मावळा आहे तो आपल्यासाठी एकत्र येणारच आणि या मावळ्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला शिरसावंघ असेल. पण इथून पुढे आपल्याबद्दल एक वाक्य काय एक शब्द जरी कोणी चुकीचा बोलायची हिंमत केली तर त्याचा आम्ही मुलाहिजा ठेवणार नाही. आपले संस्कार आहेत आमच्यावर. आजवर कधी कुठल्या कलाकृतीला विरोध केला नाही. राजकारणात सतत आपल्या नावाचा वापर केला जातो. आपल्या नावाने घोषणा दिल्या जातात. पण आपल्याबद्दल अपशब्द बोलल्यावर , राजकारणी मुग गिळून गप्प बसतात तेव्हा वाईट वाटतं. उठसूठ आपली तुलना कोणाशीही करणाऱ्यांना इतिहासाचा धडा शिकवावाच लागणार आहे. आजवर आम्ही विचारी लोकांना मान दिला म्हणून विकृतींना मान देणार नाही. आपल्याला वचन देतो. आपल्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीत कुठल्याही महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही. आपण आम्हाला स्वधर्माबरोबरच सर्वधर्म समभावाची शिकवण दिलीय. पहिल्यापासून आम्ही कायम आपल्या मावळ्यांसोबत आहोत आणि जे काही करायचं ते आम्ही एकत्र मिळून करू. 

महाराज…आपल्याकडून एक गोष्ट शिकलोय. एकीचा ध्यास असल्याशिवाय चुकीचा इतिहास मिटवता येणार नाही. यात कुठंही राजकारण न आणता एक होण्याची हीच ती वेळ आहे. विकृत लोकांशी कसं वागायचं हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. परंतु इथे काही विकृत माथी आहेत. ती कायमची वटणीवर आणायची आहेत. वारंवार आपल्याकडे बोट दाखवणाऱ्यांना शाहिस्तेखानासारखी कायमची धडकी भरवणारी अद्दल घडवावी लागणार आहे. आपल्या माणसावर वार करायचा नसतो पण चुकत असेल, शिवद्रोह होत असेल तर आता अशांना कठोर शासन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आणि महाराज आम्ही आपल्याला वचन देतो की, कोणत्याही महापुरुषांचा कोणत्याही प्रकारचा अवमान आता सहन केला जाणार नाही. 
महाराज आशिर्वाद द्या..जय भवानी जय शिवराय.. जय जिजाऊ जय शिवराय

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular