मुंबई दि २९ जून
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी श्रीगोंदयाचे भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते यांची निवड करण्यात आली आहे. युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी नुकतेच नियुक्तीचे पत्र विक्रम पाचपुते यांना दिले असून काही काळापासून राजकारणातून काहीसे अल्पित असणारे विक्रम पाचपुते आता पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना बबनराव पाचपुते हे राज्याचे मंत्री होते त्यावेळी विक्रम पाचपुते राजकारणात सक्रिय होते. मात्र मधल्या काळात विक्रम पाचपुते हे राजकारणापासून थोडे दूर गेल्याचे चित्र दिसून आले होते.गेल्या अनेक दिवसांपासून ते राजकारणापासून काहीसे दूर असल्याने पुन्हा राजकारणात येणार का नाही याबाबत अनेक वेळा तर्कवितर्क लढवले गेले. मात्र आता भारतीय जनता पार्टीने विक्रम पाचपुते यांच्यावर मोठी जबाबदारी दिली असून भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड केली असल्याने विक्रम पाचपुते आता या माध्यमातून राज्याच्या राजकारणात सक्रिय होतील. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा त्यांना ुवा मोर्चाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा संग्रह वाढवावा लागणार आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्ष संघटन मजबूत करण्याची मोठी संधी विक्रम पाचपुते यांना मिळू शकते.
विक्रम पाचपुते यांच्या निवडीनंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी विक्रम पाचपुते यांचे अभिनंदन केले आहे.