काकांच्या दशक्रियेला पुण्याहून परत येताना, जसं चासजवळ आलो, तसं नगर शहर जणू आम्हाला खायला उठलं…
अनेक आठवणींनी कंठ दाटून आला…
काकांच्या आई-वडिलांनी त्यांना दिलेलं ‘अरुण’ हे नाव त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर सार्थ ठरवलं.
जनतेची काळजी करणाऱ्या राजासारखं निस्वार्थ आणि तेजस्वी जीवन त्यांनी जगलं.‘अरुण’ हे नाव तेज, ज्ञान, आशा आणि मार्गदर्शन यांचं प्रतीक मानलं जातं – आणि काका खरंच अशाच प्रकाशाचं रूप होते.
काका हे अनेकांच्या आयुष्यात अंधारलेल्या, हताश-निराश अवस्थेतील *”अरुणोदय”* होते.
त्यांच्या सान्निध्यात आलेल्या आम्हा असंख्य लोकांना स्वतःला भाग्यवान समजावं लागेल – कारण आम्हाला काकांना जवळून पाहण्याची, अनुभवण्याची संधी मिळाली.काकांकडून आम्ही केवळ सेवा नव्हे, तर *”माणूस म्हणून कसं जगायचं”* हेही शिकलो.
आमच्यासारख्या अनेक सुशिक्षित तरुणांच्या आयुष्याचा मार्ग गोंधळात न हरवता योग्य दिशेने वळवण्याचं काम आदरणीय आमदार अरुणकाका जगताप यांनी केले.
त्यांच्या सभोवताली हजारो लोकांचा वावर असूनही, त्या प्रत्येकाच्या आयुष्यातील सूक्ष्म बाबींची माहिती काकांना असायची.कोणाच्या जीवनात काही अडचण असल्याची कल्पना मिळताच, काकांचा हक्काचा फोन त्या व्यक्तीला लागायचाच.
आणि मग तो आवाज… दरारा असलेला, पण काळजी आणि आपुलकीने भरलेला — तो आवाज म्हणजे त्या व्यक्तीसाठी रामबाण उपाय असायचा.
*काकांचा मला सर्वात आवडलेला गुण म्हणजे त्यांचं Communication Skill !*
काका कोणत्याही व्यक्तीचं मत शांतपणे ऐकून घ्यायचे – त्यांनी कधीही कोणालाही लहान किंवा कमी लेखलं नाही.त्यामुळेच विविध वयोगटातील, सामाजिक स्तरातील, गरीब-श्रीमंत प्रत्येक व्यक्तीला ते “कुटुंबप्रमुख” वाटायचे.
काकांकडे पांडुरंगासारखी माणसाला माणूस म्हणून पाहण्याची दैवी दृष्टी होती. कोण बीएमडब्ल्यूतून येतो, कोण सायकलवरून, त्यांच्यासाठी सर्व माणसे सारखीच.”जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपले…” ही तुकोबांची उक्ती काकांवर तंतोतंत लागू होते.
काकांची समाधानी वृत्ती आणि निस्वार्थ सेवा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे रत्न होते.त्यांना कधीही ना पदाची हाव होती ना संपत्तीची. त्यामुळेच त्यांनी जिथे जे मिळालं, ते उदारतेने लोकांवर वाटलं.
काका गेल्यानंतर कुठेही त्यांच्या विषयी नकारात्मक चर्चा नाही — केवळ हळहळ आणि पोकळी.नगर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लोक हृदयातून शोक करत आहेत.
रुबी हॉलमध्ये उपचार घेत असताना हजारो लोक रोज भेटायला आले.वृद्ध मंडळी डोळ्यांत पाणी आणून त्यांच्या आठवणी सांगत, आणि देवाकडे त्यांच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत.रुबी हॉलचे सुरक्षारक्षकसुद्धा म्हणाले — एवढं लोकप्रेम आम्ही आजवर कुठल्याही नेत्याला मिळताना पाहिलं नाही.
राजकीय स्वार्थासाठी कधीही तडजोड न करणारा नेता म्हणजे अरुणकाका होते.त्यांच्या कुटुंबावरही अनेकदा वैयक्तिक टीका झाली, पण काकांचा संयम कायम ठाम राहिला.
माझे मामा पैलवान अशोक शिरसाठ काकांच्या जुन्या आठवणी सांगताना म्हणतात —
“काकांच्या सामाजिक कामात उभा राहिलेला तेजोमय प्रकाश अनेकांना सहन होत नसे, त्यामुळे अफवांचा खेळ सुरु झाला.पण ज्यांनी त्यांचं सान्निध्य अनुभवलं, ते कधीच काकांपासून दूर गेले नाहीत. त्या अफवांचे पितळ हळूहळू उघड पडत गेलं आणि लोकांनी त्यांना आपल्या मनातील राजा मानून अपेक्षेने आणि विश्वासाने पाहायला सुरुवात केली.
काकांनीही तो विश्वास प्रत्येक वेळी सार्थ ठरवला — कोणतीही अडचण असो, संकट असो, त्यांनी कोणालाही कधीच निराश परत पाठवलं नाही.
त्या विश्वासाच्या नात्यावर काकांनी नगरकरांच्या हृदयात कायमचं स्थान मिळवलं.
अरुणकाका हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते, ते एक चालतं-बोलतं मूल्य होतं.
ते गेले, पण त्यांनी उभं केलेलं प्रेम, विश्वास, आणि संस्कार अजूनही आपल्या हृदयात जिवंत आहेत.
इंजि.योगेश फुंदे यांच्या संग्रहातून