अहिल्यानगर 19 मे
महिना अखेर आला की सर्वसामान्य माणूस किराणा सामानाची यादी घेऊन जसा किराणा दुकानाकडे जातो आणि उधारीवरून किराणामाल घेऊन आपल्या पुढील महिन्याचा गाडा चालवतो. त्याचप्रमाणे परिवहन खात्यातही दर महिन्याला काही एजंट वाहनांची यादी घेऊन रोख लक्ष्मी देऊन महिनाभर ओव्हरलोड गाड्या शहरातून जाण्यासाठी अधिकाऱ्यांच्या हातात लक्ष्मी ठेऊन संपूर्ण महिन्याचा ओरड गाड्यांचा प्रवास सुखकर करतात.
आरटीओ अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप थेट आमदारांनी केल्यामुळे या आरोपांमध्ये मोठे गांभीर्य आलेले आहे.सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आरटीओ अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या गैरकारभाराचा माढाचे आमदार अभिजीत पाटील आणि सत्ताधारी भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी भ्रष्टाचाराचा पाढा वाचला.
तसा हा प्रकार सोलापूरमध्ये नव्हे तर महाराष्ट्र मध्ये सर्व ठिकाणी सुरू आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातही हा प्रकार सुरू असून जड वाहतूक करणाऱ्यांना एक रेट कार्ड देऊन त्यांच्याकडून दरमहा लाखो रुपये कमवण्याचा धंदा काही अधिकाऱ्यांकडून खुलेआमपणे सुरू आहे. मात्र शेतमाल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांकडून दंड आकारला जातो त्याचप्रमाणे सर्वसामान्य लोकांकडून दंड वसूल करून आरटीओ अधिकारी आपले टार्गेट पूर्ण करतात.
अहिल्यानगर जिल्ह्यातून जर ओव्हरलोड गाडी घेऊन जायची असेल तर गाड्यांच्या टायर नुसार आरटीओ अधिकाऱ्यांचे दर ठरलेले आहेत. दर महिन्याच्या विशिष्ट तारखेला हे पैसे एजंटने अधिकारांकडे जमा केले नाही तर ती गाडी पकडल्यानंतर मोठा दंड केला जातो. हा दंड वाचवण्यासाठी दर महिन्याला विशेष लक्ष्मी दर्शन अधिकाऱ्यांना द्यावे लागते.
अहिल्यानगर जिल्ह्यातून ओव्हरलोड गाडी जाण्यासाठी आकारले जाणारे दर
6 टायर गाडी साठी 1500,
10 टायर गाडी साठी 2500,
16 टायर गाडी साठी 3000
मिक्सर 3500,
मोठे टेलर 4000
वाळू, मुरुम गाडी 3500,
डिजे गाडी 5000
हे दर सध्याचे असून या मागील महिन्यापासून दर वाढवले गेले आहेत. हजारो वाहने दर महिन्याला नगर शहर हद्दीतून येत जात असतात.या ओव्हरलोड वाहनांच्या माध्यमातून लाखो रुपयांची लक्ष्मी जमा करून ते पद्धतशीरपणे वाटून घेण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे.
गीताची शपथ खाऊन शेजवलपणे सरकारी अधिकारी भ्रष्टाचार करत असतील तर उबेद सारखे लोक मोठे तर होणारच ना !
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे काम करणारे मंत्री म्हणून अख्ख्या देशाला माहित आहे भ्रष्टाचार ते कधीच खपवून घेत नाहीत.त्यामुळेच आज पर्यंत राजकीय जीवनात त्यांच्यावर आरोप करण्याची विरोधी पक्षाची कधीच हिम्मत झालेली नाही. मात्र आरटीओ खात्यातील काही अधिकारी भ्रष्टाचाराच्या जाळ्यात एवढे अडकले आहे की त्यांना या जाळ्यातून बाहेर पडणे आता अशक्य झाले आहे.
राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यावर ताण पडतो. अनेक रस्ते हे अशा ओव्हरलोड वाहतुकीमुळे खराब झाले आहेत. त्याचबरोबर अनेक अपघातही या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अहिल्यानगर शहरात याआधी झालेले आहेत त्यामुळे हे अवजड वाहतूक बंद करणे गरजेचे आहे.