अहमदनगर दि.४ ऑगस्ट : नगर शहर विधानसभा मतदारसंघात दिवंगत आमदार अनिल भैय्या राठोड यांनी भरीव काम केले आहे. त्यांची पुण्याई तुमच्या पाठीशी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा तुम्ही पुढे न्या, मी आहेच तुमच्या बरोबर, नगर विधानसभेच्या जागेसंदर्भात शिवसेनेच्या वरिष्ठांशी माझी चर्चा झाली आहे, असे सूचक वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी नगरमधील शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या.
पुणे येथे मोदी बागेत खासदार पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचवेळी नगरहून गेलेल्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली. नगर शहरातील सद्यस्थिती, राजकीय हालचालींबाबत चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश कानडे, शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते. नगरहून युवा सेना प्रदेश सहसचिव विक्रम राठोड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, मंदार मुळे यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली.
नगर शहर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या घडामोडींबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली. ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. आमदार अनिल राठोड यांनी या मतदारसंघात भरीव कार्य केलेले आहे. शिवसेनेची या मतदारसंघावर पकड आहे. राठोड परिवाराला नगरकरांनी कायम साथ दिली आहे. दिवंगत आमदार अनिल राठोड यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मोठा असून त्यांचे विचार आणि वारसा पुढे नेणाऱ्या उमेदवारालाच चांगली संधी आणि यश मिळेल. आपण सेनेच्या वरिष्ठांशी याबाबत सखोल चर्चा केली आहे. तुम्ही तयारीला लागा. शिवसेनेने पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जा, असा सल्ला त्यांनी दिला.
खासदार शरद पवार यांच्या भेटीनंतर नगरची जागा निश्चितच शिवसेनेला सुटेल, असा आशावाद व्यक्त करत मागील निवडणुकीत आमदार अनिल भैय्यांशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही, असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला.
तर काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत हे श्रीगोंदा येथे आले असताना त्यांनी नगर शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष संभाजी कदम यांच्याशी चर्चा करताना नगर शहराची जागा आपलीच असून तुम्ही तयारीला लागा असा संदेशही दिला होता उमेदवार नंतर ठरेल मात्र जागा शिवसेनाच मिळेल असा विश्वास संजय राऊत यांनी बोलून दाखवला होता.